Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुड्याचा (Satpuda) डोंगररांगांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे तोरणमाळ येथील सात पायरी घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. तर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील झाडे दूर करुन वाहतूक सुरु केली आहे. 


राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तसेच गुजरात आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचे वर्षा पर्यटनाचे आवडते ठिकाण असलेल्या तोरणमाळ घाटात  रस्ता खचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच कोसळलेल्या दरडीचा ढिगारा रस्त्यावर असल्याने वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्ता खचल्याने मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी एकाच वेळी दोन वाहने पास होऊ शकत नाही. 


दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा जनसंपर्काचा हा रस्ता असून तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्याही मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गाड्या ये-जा करत असतात. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अपघात होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने राणीपूरपासून तोरणमाळपर्यंत असलेल्या 22 किलोमीटर घाट मार्गाची ज्या ठिकाणी रस्ते खचले आहेत त्या ठिकाणची दुरुस्ती करावी मागणी परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे.


सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये जोरदार पाऊस झाला
नंदुरबार जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असून याचा फायदा पिकांना झाला असून आवश्यकता असताना पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले आहे तर दुसरीकडे पावसामुळे नुकसान झाल्याचे ही घटना समोर येत आहेत. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये जोरदार पाऊस झाला असून नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र असे चित्र असले तरी नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचं चित्र आहे. दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे .


नागण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अनेक भागात दमदार पाऊस होत असून नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणातील पाणी पातळी वाढली आहे. नवापूर तालुक्यातील भरडू येथील नागण प्रकल्पातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे. नागण नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.