Nandurbar Crime : तळोदा तालुक्यातील दलेरपुर शिवारात कापसाची वेचणी करणाऱ्या मजुरांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय. कापूस वेचणी करत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात अनिल करण सिंग तडवी या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण
बिबट्याने हल्ला केल्यानंतर जखमी अनिल तडवी यास तळोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. तळोदा तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि हल्ले लक्षात घेत शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील वाढत्या बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शेतीत कामासाठी मजूर जाण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने या भागातील हिंसक बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची गरज आहे.
शेतात काम करत असलेल्या दाम्पत्यावर अस्वालाचा हल्ला
शेतात काम करत असलेल्या शेतकरी जोडप्यावर दोन अस्वलांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमींपैकी शेतकऱ्याची स्थिती गंभीर आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील माण गावातील शिवारात ही घटना घडली. अस्वलाच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात पती,पत्नी काम करत होते. यावेळी अचानक दोन अस्वले शेतात आली आणि त्यांनी पती,पत्नीवर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखून शेतकऱ्याच्या पत्नीने पळ काढून आरडा ओरड करून लोकांना बोलावले. अस्वलांनी शेतकऱ्याच्या पायाचे लचके तोडले असून त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.सखाराम महादेव गावकर (63) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जखमी शेतकऱ्याला बेळगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या