नंदुरबार : जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी करण्यासाठी आदिवासी भागातून येणाऱ्या महिला आणि नातेवाईकांना रात्री बँकेच्या बाहेर उघड्यावर मुक्काम करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहादा (Shahada) शहरातील बँकच्या बाहेरची विदारक स्थिती समोर आली असून ई-केवायसी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नंबर लागत नसल्याने लाभार्थ्यांच्या बँकेच्या बाहेर मुक्काम करावा लागत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी महिलांकडून होत आहे.  


राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. मात्र, आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने चकरा माराव्या लागत आहे. दररोज येण्या-जाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुक्कामी थांबत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.


बँकेच्या बाहेर मुकामी राहण्याचा निवडला पर्याय


लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या बँकेत ई-केवायसी करावी लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बँकेची खाते उघडले आहेत. मात्र, केवायसी नसल्याने आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागत आहे. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने अनेकांना रिकाम्या हातांनी परत जावे लागत आहे. दररोज येऊन परत जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने अनेक महिलांनी आणि त्यांचा नातेवाईकांनी बँकेच्या बाहेर मुकामी राहण्याचा पर्याय निवडलेला आहे.  


उपाययोजना करणे गरजेचे 


सरकारने एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारावी आणि गावपातळीवर उपाययोजना करणे अपेक्षित आसताना आदिवासी भागातील महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी महिलांनी केली आहे. 


मागील महिन्यात महिलांची चेंगराचेंगरी 


दरम्यान, मागील महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक (State Bank) शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला होता. या चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडल्या होत्या. ई केवायसीसाठी (E-KYC) बँकेत महिलांनी मोठी गर्दी केली असतानाच हा प्रकार घडला होता. 


आणखी वाचा 


Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीवर लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम होणार नाही, शरद पवार यांनी कारण उलगडून सांगितलं