Nandurbar News : सध्याच्या धावपळीच्या जगात कुणाला कधी मरण येई सांगता येत नाही. मात्र अनेकदा मरणानंतरही मरण यातना सहन कराव्या लागतात. राज्यातील अनेक भागात आजही स्मशानभूमीच नसल्याचे वास्तव आहे, कधी लाकडचं नाही, तर कधी मृतदेहाची हेळसांड झाल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. पण कोण कधी देवदूतासारखं धावून येईल, हे ही सांगता येत नाही. अशा घटनेचा प्रत्यय नंदुरबार जिल्ह्यात घडला आहे.
एकीकडे पोलीस (Police) म्हटलं कि आजही सामान्य माणूस दोन हात लांबच राहतो. अनेकदा पोलिसाच कामच नको म्हणून अनेकजण पोलिसांना टाळतात. मात्र याच खाकी वर्दीच्या मागे एक माणूसही असतो, याची जाणीव नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यातील ग्रामस्थांना आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील स्मशानभूमीत अनेक दिवसांपासून मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडे नसल्याने मृतदेहांची हेळसांड होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. याबाबत अनेकदा नातेवाईकांकडून तीव्र संतापही व्यक्त करण्यात येत होता. अखेर नवापूर पोलिसांनी तात्काळ या स्मशानभूमीत (cemetery) तब्बल चार टन लाकडांची व्यवस्था करून देत माणुसकीचे दर्शन घडविले.
कवि सुरेश भट (Suresh Bhat) एका ठिकाणी म्हणतात कि, इतकेच जाताना सरणावर कळले होते, जगण्याने केली सुटका मरणाने छळले होते! या ओळींच्या नेमका उलट प्रत्यय नवापूरातील रहिवाशांना आला आहे. गेल्या आठवडय़ापासून नवापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडेच नसल्याने स्मशानभूमीत आणलेले मृतदेह ताटकळत ठेवण्यात येत होते. सोमवारी एकाच वेळी तीन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले असताना लाकुड नसल्याने मृतदेह बाजुला ठेवुन त्यांच्या कुटुंबीयांना लाकुडाची जमवाजमव करावी लागली होती. मृतदेहांची हेळसांड होत असल्याने मयतांच्या नातेवाईकांसोबतच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेबाबत नंदुरबारच्या जिल्हा पोलीसप्रमुखांनी नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना तातडीने हालचाल करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस अधीक्षकांसह नवापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून सुमारे चार टन लाकडे उपलब्ध करून दिली. अंत्यसंस्कारासाठी खोळंबलेले मृतदेह मार्गस्थ झाले.नवापूर परिसरात लाकडे उपलब्ध नसल्याने लगतच्या गुजरात राज्यातून पोलीसांनी ही लाकडे उपलब्ध करुन दिली हे विशेष! नंदुरबार पोलिसांनी मानवाच्या अंतिम प्रवासादरम्यान असा वेगळा माणुसकीचा धर्म निभावला आहे. पोलीसांतील या जिवंत माणुसकीचे दर्शन झाल्याने नवापूर परिसरातील मयताच्या नातेवाईकांनी साश्रू नयनांनी पोलीसांना धन्यवाद दिले आहेत. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे या पोलीस टीमने हे आपले कर्तव्य असल्याचे सांगून माणुसकी जिवंत असल्याची जाणीव नागरिकांना करून दिली.