Nandurbar Agriculture News : सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato Farmers) अडचणीत सापडले आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. टोमॅटोच्या एका कॅरेटची विक्री सध्या 60 ते 80 रुपयांना होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.  


टोमॅटोच्या लागवडीचा खर्चही निघणे कठीण


गुजरातची परसबाग म्हणून नंदूरबार जिल्ह्याची ओळख आहे. कारण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला  गुजरात राज्यातील मोठ्या शहरात पुरवला जातो. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून टोमॅटोची आवक वाढली असून, दरही पडले आहेत. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजारात प्रचंड आवक असल्यानं टोमॅटोचं एक कॅरेट 60 ते 80 रुपयांना जात आहे. या पैशातून शेतकऱ्यांचा तोडणी खर्च देखील निघत नसल्याची स्थिती आहे. टोमॅटोच्या लागवडीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला असून दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस बाजारपेठेत टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र नंदुरबार आणि शहादा बाजार समितीत पाहायला मिळत आहे.


टोमॅटोवर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत


दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना टोमॅटो फेकूण देण्याची वेळ आली आहे. सध्याच्या दरानं शेतखऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. विदर्भात टोमॅटो सारख्या भाजीवर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत. जे आहेत ते बोटावर मोजण्याइतके आहेत. समृद्धी महामार्ग झाला आहे. या मार्गाच्या माध्यमातून टोमॅटो मेट्रो शहरपर्यंत पोहोचू शकतात. पण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर दुसरीकडे कोल्ड स्टोरेजची निर्मिती देखील झाली पाहिजे. टोमॅटो सारख्या उत्पादनाला कोल्ड स्टोरेजची नितांत गरज आहे, कारण दर आल्यावर त्याची विक्री करता येईल अशी व्यवस्था हवी आहे. 


वर्धा जिल्ह्यातही टोमॅटोच्या दरात घसरण


एकेकाळी 400 ते 500 रुपयांना विक्री होणारे टोमॅटोचे कॅरेट वर्धा जिल्ह्यात आता 50 रुपयांना विक्री होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका वर्धा (Wardha) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. दरात घसरण झाल्यामुळं टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारात कवडीमोल दरानं टोमॅटोची विक्री होत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी-मुंगापूर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतातील टोमॅटो चक्क गुरांपुढे टाकले आहेत. टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे. सततच ढगाळ वातावरण आणि बाजारात टोमॅटोची वाढलेली आवक यामुळं एकेकाळी चारशे ते पाचशे रुपयांना जाणारं टोमॅटोचं कॅरेट आता 50 रुपयांना विकलं जात आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, 500 रुपयाला विक्री होणारं कॅरेट आता 50 रुपयांना; बळीराजा चिंतेत