नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नंदुरबार (Nandurbar) दौऱ्यावर आहेत.  मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या कामाच्या तत्परतेसाठी ओळखले जातात. "माझ्या खिशाला पेन असतो, आपलं चालतं फिरतं मंत्रालय आहे" असं मुख्यमंत्री सांगतात. त्याचीच प्रचिती नंदुरबारकरांना आली. मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात मंचावरुन फोन फिरवला आणि नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला 7 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करुन दिला. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने सभागृहात एकच जल्लोष झाला. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नंदुरबार नगर परिषद नूतन इमारत उद्घाटन झालं. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री विजय कुमार गावित, खासदार हिना गावित, खनिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. 


मंचावरुनच फोन फिरवला


यावेळी शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं भाषण सुरु होतं.  चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली. विलासराव आलेले असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी 3 दिवसात मंजूर केला असे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरुनच अधिकाऱ्यांना फोन लावून 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने उपस्थितांनी टाळ्या वाजवीत, घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला 7 कोटी रुपयांचा  निधी फोन करून मंजूर केला.  


Video:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरुनच फोन फिरवला, नंदुरबारला 7 कोटी मंजूर


 


मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा 


गेली आठवड्यापासून चर्चेत असलेला नंदुरबार येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली. मुखमंत्र्यांच्या या दौऱ्यात शेवटच्या क्षणी सुधारणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्या दौऱ्याची सुरूवात पालकमंत्री डॉ विजयकुमार गावीत यांच्या निवासस्थानापासून केली. 


मुख्यमंत्र्यांच्या दौरावर भाजप काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता मुख्यमंत्री स्वतः आधी डॉ गावितांकडे गेल्याने तर्कवितर्काना पूर्णविराम मिळाला. सुरूवातीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेचे आगमन झाल्यानंतर ते थेट नगरपरिषद नूतन इमारतीच्या लोकार्पणाला हजेरी लावणार होते. सुधारित दौऱ्यानुसार मुख्यमंत्री शिंदेंनी दहा मिनिट डॉ गावितांकडे भेट दिली. नंदुरबार तालुक्यात शिंदे सेना विरुद्ध भाजपा असा राजकीय संघर्ष असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची या कार्यक्रमासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्री डॉ गावीत यांच्या भेटीच्या राजकीय खेळीने शिंदे सेना आणि भाजपचा यांच्या स्थानिक संघर्षावर भविष्यात काय परिणाम होतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.