Continues below advertisement

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी जारी करण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटच्या आधारे आम्हालाही अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी बंजारा समाजाने केली. त्यावर शिवसेनेचे नंदूरबारचे आदिवासी आमदार आमश्या पाडवी यांनी थेट सरकारला इशारा दिला. बंजारा आणि धनगरांना जर एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर सरकारमधून बाहेर पडणार असं आमश्या पाडवी म्हणाले.

आदिवासींमध्ये बंजारा, धनगर समाजाला घुसू देणार नाही. त्यानंतरही जर सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीचे आरक्षण दिले तर मी सरकारमधून बाहेर पडणार असा इशारा आमदार आमश्या पाडवी यांनी दिला. आमश्या पाडवी यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याची बंजारांची मागणी

राज्य सरकारने मराठा समाजाच्या कुणबी नोंदींसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला. त्या माध्यमातून ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. त्याच आधारे आता बंजारा समाजाकडून अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. धनगर समाजानेही गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

बंजारांना आदिवासीमध्ये येऊ देणार नाही

बंजारा समाजाच्या या मागणीला नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे आमदार आमश्या पाडवी यांनी विरोध केला. ते म्हणाले की, "हैदराबाद गॅझेट लागू झाले म्हणून कुणीही आदिवासी प्रवर्गात येईल असं होणार नाही. आदिवासी बनण्यासाठी आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. बंजारा समाजाने कितीही आंदोलनं केली तरी आम्ही त्यांना आदिवासींमध्ये येऊ देणार नाही. धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासींमध्ये घुसू देणार नाही."

मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू केलं आहे, त्यामुळे त्याविषयी मराठा समाजाने बघावं. आम्ही आमची लढाई लढणार आहोत. मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत कुणालाही आदिवासींमध्ये घुसू देणार नाही असा इशारा आमश्या पाडवी यांनी दिला.

आरक्षणासाठी धाराशिवमध्ये आत्महत्या

धाराशिवमधील बंजारा समाजाचा तरूण पवन चव्हाणने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. पवन चव्हाण हा पदवीधर बेरोजगार होता. त्याचं वय 32 वर्षे होतं. जालना येथील आरक्षणाच्या आंदोलनातून परतल्यानंतर पवनने टोकाचं पाऊल उचललं. पवनच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं, अशी मागणी पवनने सुसाईड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबाने केला.

ही बातमी वाचा: