पेशव्यांच्या मदतीने मंदीराचा जिर्णोद्धार
नांदगाव शहरातून वाहणाऱ्या शाकंबरी आणि लेडी नदीच्या संगमाजवळ एकवीरा मातेचं मंदीर आहे. 17 व्या शतकात या परिसरातील ब्रम्हानंद महाराजांना देवीचा दृष्टांत झाला आणि पेशव्यांच्या मदतीने त्यांनी या मंदीराचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं.
आखीव-रेखीव अशा भक्कम दगडांमध्ये या मंदीराचं बांधकाम करण्यात आलं आहे. मंदीरासमोर 31 फूट उंचीची दगडी दिपमाळ, आणि त्याखाली श्री गणेशाचं छोटं मंदीर आहे. मंदीरात जाण्यापूर्वी या गणेशाचं दर्शन घेऊनच भावीक देवीच्या मुख्य मंदीरात जातात.
महिला भाविंकाकडून मनोभावे पुजा
एकविरा देवीच्या या मंदीराला दोन घुमट आहे. तर दुसऱ्या गाभाऱ्यात 6 फुट उंचीची देवीची स्वयंभू दगडाच्या आकारात असलेली ही मुर्ती पूर्वी शेंदुरचर्चित होती. हळुहळू देवीची महती पंचक्रोशीत पसरल्याने या ठिकाणी गर्दी होऊ लागली आणि कालांतराने 11 फुट उंचीच्या अठराभुजा असलेल्या देवीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली.
देवीच्या अठरा भुजांमध्ये अठरा आयुधं आहेत. बाजूला रेणूका माता आणि गणेशाची मुर्ती आहे. चैत्रोत्सव काळात आणि शारदीय नवरात्रोत्सव काळात येथे यात्रा भरते. नवरात्रोत्सवात महिला भाविक नऊ दिवस घटी बसवतात.
नवसाला पावणारी एकवीरा देवी
ग्रामदेवतेवर येथील भाविकांची अपार श्रध्दा असल्यानं अनेकांना चांगले अनुभव आले आहेत. देवीमुळे मनोकामना पूर्ण झाल्याच भाविक सांगतात. तर मंदीरात देवीच्या दर्शनाने एक वेगळीच स्फुर्ती मिळत असल्याचा काहींचा अनुभव आहे.
या मंदीराची संपुर्ण देखभाल ही हिंदू पंच कमेटी ट्रस्ट तर्फे केली जाते. सध्या मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं काम पुर्ण झालं असून मंदीर परिसर पुढील वर्षापर्यंत सुशोभित करण्याचा ट्रस्टचा मानस आहे.
पाहा व्हिडिओः