नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यभरात तापला आहे. दरम्यान, यावरुन संपूर्ण राज्यात आंदोलन केले जात आहे. तर नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी युवकाने आत्महत्या (Suicide) करुन जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनात सहभागी असलेल्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावातील ही घटना आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने आत्महत्या केल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. दरम्यान या घटनेनंतर गावातील फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेयत. सद्या गावात पोलीस दाखल झाले असल्याची माहित आहे.
साखळी उपोषणातही होता सहभाग
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन देवराये हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या अनेक मोर्चात तो सहभागी देखील झाला होता. तर, मराठा आरक्षण आणि जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी कामारी गावात 14 सप्टेंबरपासून साखळी उपोषण करण्यात आले होते. या उपोषणात देखील सुदर्शन देवराये याचा विशेष सहभाग होता. मात्र, आरक्षण मिळत नसल्याने सुदर्शन अस्वस्थ होता. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
राज्यभरात आंदोलन सुरुच
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात आंदोलन, मोर्चे आणि उपोषण सुरुच आहे. जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिल्यावर आपले उपोषण मागे घेतलं. मात्र, याचवेळी त्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यात आंदोलन सुरु असल्याचे दिसत आहे. रविवारी (17 सप्टेंबर) देखील सांगलीत भव्य असा मोर्चा सकल मराठा समजाच्या वतीने काढण्यात आला होता.
'टोकाचे पाऊल उचलू नका'
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, यासाठी राज्यभरात आंदोलन देखील केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी तरुण टोकाचे पाऊल उचलत आपलं जीवन संपवत आहे. त्यामुळे तरुणांनी असे कोणतेही भूमिका घेऊन टोकाचे पाऊल उचलू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असून, तरुणांनी संयम ठेवावा असे आवाहन मनोज जरांगे यांनी यापूर्वीच अनेकदा केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sangli Maratha Kranti Morcha : सांगलीत मराठा क्रांतीचा विराट मोर्चा; तरुणी, महिलांचा लक्षणीय सहभाग