Nanded News Update : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाच्या फटक्याने यावर्षी शेतकऱ्यांची (Farmer) दिवाळी अक्षरशः पाण्यात गेलीय. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. नांडमधील जवळपास दीड लाख हेक्टरवरील सोयाबीनचे पिक (Soybeans Crop) पाण्यात गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने नुकसाना झाल्यामुळे यंदा शेतकऱ्याला दिवाळीचा सण देखील साजरा करता आला नाही. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्याला दिवाळ सणाचे कपडे, गोडधोड तर दूरच पण आता खाण्या पिण्याचेही वांदे होऊन बसलेत. अतिवृष्टीचे अनुदान, पीक विम्यास बँकांचा खोडा आणि परतीच्या पावसाचा तडाखा अशा सर्वच बाजूंनी शेतकरी पिचला गेलाय. परतीच्या पावसाच्या तडाख्याने पिकांसह शेतकऱ्यांच्या संसाराची मात्र धूळधाण झालीय. सरकारकडून मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बीची पेरणी करण्याची वेळ आलीय.
नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 850 मिलिमीटर पावसाची नोंद होते. परंतु, यावर्षी 1350 ते 1400 मिलिमीटर पेक्षा पाऊस झालाय, जो दरवर्षीच्या तुलनेत 400 मिलिमीटर पेक्षा जास्त आहे. सुरुवातीला अवकाळी, नंतर अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाच्या जोरदार तडाख्याने यावर्षी सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा पोळा गोड करू असे आश्वासन दिले होते. परंतु पोळा गेला, दसरा गेला आणि आता दिवाळीही गेली. मात्र शेतकऱ्यांच्या तोंडी मदतरुपी सरकारची साखर पडून तोंड गोड झालं नाही. पीक विमा मिळाला नाही, अतिवृष्टी मदत काही शेतकऱ्यांना मिळालीय, पण तीही अत्यल्प आहे. दरम्यान रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना रब्बीची पेरणी कशी करावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यां पुढे आहे.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त होवूनही ऐन दिवाळीच्या तोंडावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली असून. ऐन दिवाळीच्या तोंडावर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर संक्रात कोसळलीय. खरीप हंगामात काहीच शिल्लक राहिले नसल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी पेरणीला सुरूवात केलीय. आता तरी पिक विमा, अतिवृष्टीचे अनुदान सरकारने लवकरात लवकर द्यावे यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.