नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना नांदेडमध्ये (Nanded) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नांदेड महानगरपालिकेतील (Nanded Municipal Corporation) माजी शिक्षण सभापती अपर्णा नेरलकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आणि चिमेगावच्या सरपंचांनीही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला आहे.
नांदेड शहर काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अशोक चव्हाण यांची मोठी ताकद नांदेड शहराच्या राजकारणात आहे. दरम्यान, अशातच शिंदे गटाकडून नांदेडमध्ये काँग्रेसला एक मोठा धक्का देण्यात आला आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापती अपर्णा नेरलकर यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख उमेश दिघे, चिमेगाव चे सरपंच शहाजी आढाव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तसेच त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) संपर्कप्रमुख आनंदराव जाधव आणि आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला आहे. विशेष म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
"नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपलब्ध होत असलेला भरीव निधी आणि त्यातून शहराचा होत असलेला कायापालट यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यातील काही जणांचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी काळात नांदेड शहरातील अनेक राजकीय नेते शिवसेनेत प्रवेश करणार असून, नांदेड जिल्ह्यात शिवसेना नंबर एकचा पक्ष असेल." असं आमदार बालाजीराव कल्याणकर म्हणाले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण?
आगामी काळात नांदेड महानगरपालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अततापासूनच कामाला लागले आहेत. महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच महत्वाचे नेत्यांकडून यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात सर्वच पक्षात फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर याची सुरवात झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काळात शहरातील राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: