नांदेड : शासकीय रुग्णालयात (Government Hospital) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरुनच आता राजकीय वातावरण देखील तापताना पाहायला मिळत असून, ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर नांदेड (Nanded) शहरातील उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. या घटनेत दोषी असलेल्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाले असून, त्यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर शिवसेना उबाठा गटाच्यावतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदरील घटनेच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.
जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन...
यावेळी उद्धव ठाकरे गटाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, "डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांपैकी उपचार चालू असताना 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. या मध्ये 12 लहान बालकांचा समावेश आहे. सदरील दुर्घटना अत्यंत गंभीर असून निष्काळजी व अमानुशपणाचा कळस आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण हे साधारणपणे सर्वसामान्य कुटुंबातील असतात. अशा घटनेने शासकीय रुग्णालयावरील उपचाराबाबतचा अविश्वास आणखीनच बळावेल. अशा घटना वारंवार घडणे दुर्दैवी आहे. या दुर्घटनेची परिपूर्ण सखोल चौकशी करून संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अत्यंत कठोर कार्यवाही करण्यात यावी. रुणांच्या नातेवाईकास प्रत्येकी 25 लाखाची तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी," अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
खासदार हेमंत पाटील संतापले...
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 36 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याने अनेक राजकीय नेते आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी देखील रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी रुग्णालयात पाहणी करत त्यांनी आढावा घेतला. रुग्णालयातील असुविधा पाहून हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडे बोल सुनावले. रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाहीय. अशातच औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. रुग्णालय प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील खासदार हेमंत पाटील यांनी केलीय.
इतर महत्वाच्या बातम्या :