नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्या संदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. शरद पवार यांनी उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही, भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे, असं अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र होणार का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षाची ताकद वाढेल. दोन्ही पक्ष एकत्र यावेत, असं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. माझी पण हीच इच्छा आहे, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षाची ताकद वाढेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. उद्या रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने चिखलीकर यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
उद्या रविवारी मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश सोहळा पार पडणार आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांचे 100 हून अधिक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे. शिवाय अजित पवार हे देगलूर येथील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबीयांना सांत्वन पर भेट देणार आहे. अशी माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.
दोन्ही एनसीपी एकत्र आले तर ताकद वाढेल : उत्तमराव जानकर
माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सोलापूरचे आम्ही चार आमदार आहोत. आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे साठी आम्ही जयंत पाटील यांना भेटलो होतो. शरद पवार साहेबांना पण याविषयी बोलणं झालं होतं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास ताकद वाढेल. अजित पवार यांच्यावर टीका करूनही त्यांनी मला माझ्या मतदारसंघात काम केली आहेत,त्यांनी पाणी दिलं. अजित पवार यांच्या मनात कुठेही द्वेष नाही दिसला नाही. शरद पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल.मतदारसंघात काम असतात अडचणी असतात त्यामुळे सरकारची गरज असते, असं उत्तमराव जानकर म्हणाले होते.