अमरावती : नांदेडची पोटनिवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात सुरुवातीला राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती समोर आली होती. मात्र अशोक चव्हाण यांनी मी ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले. यानंतर आता भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) या नांदेड लोकसभा (Nanded Lok Sabha) पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत (Maharashtra Assembly Elections 2024) नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची देखील घोषणा केली. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेडची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानादिवशीच म्हणजे 20 नोव्हेंबरलाच या लोकसभेसाठी मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल असणार आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत?
काँग्रेसने या जागेवर वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आता भाजप नेत्या नवनीत राणा यांचे नाव या निवडणुकीसाठी समोर येत आहे. त्यामुळे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी द्यावी
भाजप नेत्या नवनीत कौर या अमरावती लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. आता नवनीत राणा यांना भाजपकडूनच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत पुन्हा उमेदवारी द्यावी मागणी करण्यात आली आहे. कारण नवनीत कौर राणा यांचे वडील मूळचे पंजाबचे आहेत. नांदेड येथे शीख समाजाचं मोठं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो, असं भाजपच्या एका गटाने सांगितल्याची माहिती मिळत आहे. आता यावर भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.