नांदेड : नांदेड येथील प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान त्या हत्येचा छडा नांदेड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लावून सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतु हत्येचा छडा लागल्यानंतर बियाणी कुटुंबीयांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून आर्थिक कलह निर्माण झाला आहे.


दरम्यान या आर्थिक कलहातून संजय बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी आणि भाऊ प्रवीण बियाणी यांनी विमानतळ पोलिसात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यात भाऊ प्रवीण बियाणी याने या अनिता बियाणी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. तर संजय बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी यांनी आर्थिक व्यवहाराची माहिती असणारी डिस्क प्रवीण बियाणी यांनी चोरल्याची तक्रार दिली आहे.


संजय बियाणी हयात असताना विश्वास ठेवून त्यांनी रवी बियाणी यांच्या नावे 13 एकर तर प्रवीण बियाणी यांच्या नावे 6 एकर जमीन अशी एकूण 19 एकर जमीन केली होती. दरम्यान बियाणी यांच्या हत्येनंतर संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी रवी बियाणी आणि प्रवीण बियाणी यांना सदर जमीन आपला मुलगा राज बियाणी यांच्या नावे करुन देण्यास सांगितली. पण जमीन नावावर करुन द्यायची असेल तर रवी बियाणी यांनी दोन कोटी रुपये आणि प्रवीण बियाणी यांनी 94 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप अनिता बियाणी यांनी केला आहे.


तर प्रवीण बियाणी यांनी सदर जमीन आपण स्वतः घेतली असून राज मॉल येथील कार्यालय सुद्धा संजय बियाणी यांचे नसून आपले असल्याचे सांगितलं. तर परस्परविरोधी तक्रार दिल्यानंतर प्रवीण बियाणी यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्याठिकाणी रुग्णालयातही पोलिसांचा खडा पहारा बियाणी यांना आहे. परंतु या वादाविषयी विमानतळ पोलिसांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे.


तर दीर प्रवीण बियाणी यांनी दोन दिवसांपूर्वी घरी येऊन वाद घातल्याचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. दरम्यान संजय बियाणी यांच्या हत्येनंतर अवघ्या अडीच महिन्यात आर्थिक व्यवहारातून कौटुंबिक कलह मात्र उफाळला आहे, ज्यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटलंय हे मात्र नक्की आहे.


बियाणी हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, सात जण पोलिसांच्या ताब्यात
नांदेडमधील बियाणी हत्या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे. संजय बियाणी हत्येप्रकरणी अडीच महिने तपासाची चक्रे फिरवत SIT प्रमुख विजय काबाडे यांच्या पथकाने पंजाबमधून एक तर नांदेडमधून सहा आरोपी ताब्यात घेतलं. परंतु, संजय बियाणी यांच्यावर गोळ्या घालणारे या घटनेतील उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील दोन मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. कुख्यात गुंड हरविंदरसिंह रिंदा याच्या सांगण्यावरुन ही हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. खंडणीच्या कारणावरुन ही हत्या केली असून दहशत निर्माण करायची आणि नंतर उद्योजकांकडून खंडणी वसूल करायची असा आरोपींचा बेत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. 


काय आहे प्रकरण?
जवळपास अडीच महिन्यांपूर्वी नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर दोन हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली होती. नांदेड शहरातील गीता नगर परिसरात बियाणी हे आपली गाडी घरासमोर लावत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी बियानी यांच्यावर तब्बल बारा गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तिथून पळ काढला होता. संजय बियाणी यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आलं. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर नांदेड शहरात एकच खळबळ माजली होती.