नांदेड : मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागातील लिपिकासह अन्य एकास 20 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. 2 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, रात्री उशिरा पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश चिंताहरी काठीकर, (वय 52 लिपीक, स्थानिक संस्था कर व अतिरिक्त कार्यभार क्षेत्रीय कार्यालय क्र. 4, वजिराबाद, नांदेड) तसेच खाजगी ईसम मिर्झा अफजल बेग शमशोद्दीन बेग, (वय 54 वर्षे, व्यवसाय -ट्रान्सपोर्ट, रा. गुलजार बाग, गल्ली नं. 8, टिपु सुलतान रोड, नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत.
यातील तक्रारदार हे स्वतःचे आणि त्यांचे भावाचे मालकीचे जागेत टीन शेड उभे करून त्यामध्ये कापड दुकान चालवतात. दरम्यान, 27 रोजी रविवार शासकीय सुट्टी असताना सुद्धा महानगरपालिकेचा कर्मचारी येवून त्यांचे बांधकामाची मोजणी करून गेला. तसेच जाताना महात्मा गांधी पुतळ्याजवळील महानगरपालिकेच्या कार्यालयात येवून भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे 28 रोजी कार्यालयात जाऊन मोजणी केलेल्या कर्मचाऱ्यास भेटले. त्याने, 'तुमचे काम काठीकर साहेब यांच्याकडे असून, तेच तुमचे काम करणार आहेत',असे सांगितले. तेव्हा तक्रारदार हे लिपिक काठीकर यांना भेटले. त्यांनी, 'तुमचे बांधकाम महानगरपालिकेची परवानगी न घेता चोरून केले आहे. बांधकाम पाडून टाकावे लागेल आणि तुम्हाला दीड लाख रुपयाचा दंड लागेल' असे सांगितले.
दरम्यान यावेळी तक्रारदार यांनी 'साहेब बांधकाम पाडू नका, पाहिजे तर टॅक्स वाढवा' अशी विनंती केली. तेव्हा लिपिक काठीकर यांनी या कामाचे मला वेगळे 20 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. मात्र. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट एसीबी कार्यालय गाठून तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तसेच आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीच्या पथकाने सापळा लावला.
लाच घेताच एसीबीच्या पथकाने घेतलं ताब्यात...
एसीबीने सापळा लावला असता तक्रारदार यांना शासकीय पंचासमक्ष यातील खाजगी आरोपी अफजल याने, तुमचे काम 40 ते 45 हजाराचे असून काठीकर साहेब फक्त 20 हजार रूपयामध्ये करून देत असल्याचे सांगितले. त्यामुळे आताच सांगा, असे म्हणत काठीकर यांना लाच देण्यास अफझलने प्रोत्साहन दिले. तेव्हा काठीकर यांनी आता मला फोन लावायचा नाही, अफजलकडे 20 हजार रूपये देवून टाका, असेही सुनावले आणि शासकीय पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती एजंट मिर्जा यांच्या मार्फत लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एसीबीच्या पथकाने दोघानाही ताब्यात गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maratha Reservation : जालना येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या नांदेड जिल्हा बंदची हाक