Nanded Kinwat News : मारेगाव : नांदेडच्या (Nanded News) मारेगावात पाण्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरल्यानं तीन मुली बुडाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. पण पोलिसांनी याप्रकरणी बुडून मृत्यू झालेल्या ममताचा पती जावेद शेखसह दोघांना अटक केली आहे.
किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून तीन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी मयत ममताचा पती जावेद शेखसह दोन जणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
किनवट तालुक्यातील मालेगाव (खालचे) मधील पैनगंगा नदीत दोन सख्या बहिणी आणि इतर एक तरुणी अशा तिघींचा बुडून मृत्यू झाला आहे. तिघींच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. किनवट पोलिसांनी याप्रकरणाची कसून चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी दोन तरुणांना अटक करण्यात आली. दोन तरुणांविरोधात विविध कलमांसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ममता शेख जावेद (वय 21 वर्ष) पायल देविदास कांबळे (16 वर्ष) आणि तिची बहीण स्वाती देविदास कांबळे अशी पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.
याप्रकरणी किनवट पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, किनवटचे डीवायएसपी रामकृष्ण मळघणे यांनी आरोपी जावेद याची कसून चौकशी केली. त्यानंतर तिघींच्या मृत्यूप्रकरणी लक्ष्मी देवीदास कांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयत ममताचा पती शेख जावेद (रा. सायफळ ता. माहूर) आणि मिथून कुवर सदानंद कुवर या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 304, 34 सह 3 (2), (व्ही), (ए) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत असून याप्रकरणी अधिक चौकशी डीवायएसपी रामकृष्ण मळघणे करत आहेत.