नांदेड : हदगावत तालुक्यातील आश्रम शाळेतून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. शिक्षक आणि प्रशासनाच्या दु्र्लक्षामुळे आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या डोक्यात जखम झाली असून त्यामध्ये चक्क जंतू आणि आळ्या झाल्याचं समोर आलं. हदगाव उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून जखमेतील जंतू आणि आळ्या काढण्यात आल्या आहेत. या प्रकारानंतर पालकवर्गात संताप पसरला असून मुलींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष का केलं जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या मुलीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. 


पालकांना फोन करून सांगितले


हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील आश्रम शाळेत कावेरी काळबांडे ही विद्यार्थिनी इयत्ता तीसरीमध्ये शिकते. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या डोक्यात  जखमा झाल्या आहेत.शिक्षकांकडे तक्रार करूनही या जखमांकडे शिक्षक, मुख्याध्यापक कोणीही लक्ष दिले नाही. त्रास खूप जास्त वाढल्यावर तिने पालकांना याबाबत फोनवरून सांगितले. 


कावेरी काळबांडेचे पालक हैदराबाद येथे मोलमजुरी करतात. शुक्रवारी पालकांनी मुलीला आश्रम शाळेतून घेऊन हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरू केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला. कावेरीच्या डोक्यात मोठ्या जखमा आढळून आल्या. 


जखमा होईपर्यंत शाळेतील शिक्षक काय करत होते? 


अनेक दिवसांपासून डोक्यात इन्फेक्शन होऊन मोठ्या जखमा झाल्यांच समोर आलं आहे. या जखामांमध्ये जंतू झाल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टर महिलेने सांगितले. कावेरीच्या डोक्यातून जंतू काढण्यात आले असून तिच्यावर पुढील ऊपचार सुरू आहेत. 


कावेरीच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात ऊदेखील आढळल्या. इतक्या मोठ्या जखमा होईपर्यंत आश्रम शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक काय करत होते? तिला रुग्णालयात का दाखल करण्यात आले नाही? घटना उघडकीस आल्यानंतर आता काय कारवाई होणार? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 


ही बातमी वाचा: