नांदेड: शासकीय रुग्णालयात (Government Hospital) सुरु असलेल्या मृतांचा आकडा काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण मागील 24 तासांत याच रुग्णालयात आणखी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात तीन बालकांचा समावेश आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत नांदेड शासकीय रुग्णालयात मृतांची संख्या 51 वर पोहचली आहे. 2 ऑक्टोबर रोजी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर नांदेड शासकीय रुग्णालयातील (Nanded Government Hospital) भोंगळ कारभार सर्वानसमोर आला. मात्र, त्यानंतर देखील या रुग्णालयात मृतांची संख्या काही कमी होतांना दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. 


नांदेड शासकीय रुग्णालयात मागील चोवीस तासात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला असून, ज्यात 3 बालकांचा समावेश आहे. गेल्या चार दिवसांत या रुग्णालयात मृतांची संख्या 51 वर पोहचली आहे. 2 ऑक्टोबरला सर्वाधिक 24 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 3 ऑक्टोबरला 7 जणांचा मृत्यू झाला. 4 ऑक्टोबरला पुन्हा 6 रुग्णांचा जीव गेला आणि आता मागील 24 तासांत आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. 


सुप्रिया सुळे यांची टीका... 


नांदेड येथील शासकीय रुग्णालयात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे. “नांदेडची घटना अतिशय वेदना देणारी आहे. राज्यातील खोके सरकार एवढे असंवेदनशील आहे की, पालकमंत्री पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. मात्र, दोघेही नांदेडला आले नाही. ज्याठिकाणी 41 लोकं दगावले त्याठिकाणी ते येऊ शकले नाही. हा राजकारणाचा विषय नाही. आरोग्य खाते आणि आरोग्य शिक्षण या दोन्ही विभागात मोठा अंतर निर्माण झाला आहे. ज्या खाजगी विमानाने पालकमंत्री पदासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊ शकतात, त्याच विमानाने नांदेडला येऊ शकत नाही का?,” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला. 


तानाजी सांवत यांच्या राजीनाम्याची मागणी...


नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारांअभावी रुग्ण दगावल्यांच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडून आज मुंबईत ठिकठिकाणी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ शरद पवार गटाने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. तसेच, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जशी परिस्थिती राज्यात आहे तीच परिस्थिती मुंबईत देखील आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये औषधे नसल्याचा आरोप यावेळी शरद पवार गटाच्या मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव यांनी केला आहे. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded Death Case : नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप