नांदेड : गेल्या पंधरा दिवसात नांदेडमधील दुसरा पोलीस अधिकारी लाच घेताना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास वडजे यांनी एका वाळू माफीयाकडून 10 हजाराची लाच स्वीकारली. या दरम्यान एसीबीने त्यांना रंगेहात पकडलं.


दरम्यान, वडजे यांनी वाळूसाठी दोन टिप्पर चालविण्यासाठी प्रत्येकी 6 हजार प्रमाणे 12 हजार रुपयांची लाच मागितली होती. यात तडजोडीअंती 10 हजार रूपये देण्याचे ठरले असे एसीबीने प्रसार माध्यमांना सांगितले. या सोबतच वडजेकडून अंगझडतीमध्ये 35 हजार 300 रूपये सापडले आणि त्याच्या चार चाकी गाडीमध्ये 94 हजार रुपये आढळून आले असा उल्लेख केला आहे. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मात्र वेगळेच चित्र दिसत आहे, ज्यात या सापळ्यात आरोपी वडजे यांनी खूप विरोध केला. पण या कारवाई दरम्यान एसीबीच्या अधिकार्‍यांनी त्यांना पकडून ठेवले होते.
   
त्या दरम्यान एक लाचलुचपत पथकाचा एक कर्मचारी आरोपी वडजेंच्या पाठीमागे होता आणि दुसरा व्यक्ती उजव्या हाताच्या बाजूला हाफ शर्ट परिधान केलेला होता. त्यावेळी एसीबी कर्मचारी आपल्या पँटच्या डाव्या खिशातून नकळतपणे, काही तरी काढून वडजेंच्या पँन्टमध्ये, उजव्या बाजूला मागील खिशात हळूच काहीतरी टाकत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं. एवढेच नाहीतर, वडजेच्या पाठीमागे उभे असलेला  व्यक्ती हाफ शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीला पाहून हसत आहे. यावरून काहीतरी काळेबेरे असल्याची शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही कारवाई करीत असताना, पाठीमागील दोन व्यक्तींमध्ये काय सुरु होते हे कळायला मार्ग नाही. त्यानंतर वडजेच्या कानाजवळ येऊन काही तरी सांगून त्यांची समजूत काढून त्यांना गाडीत बसण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे सदर लाचलुचपत विभागाची कार्यवाही संशयास्पद असल्याची चर्चा रंगत आहे.


सदर कार्यवाही विषयी आणि व्हायरल होत असणाऱ्या व्हीडीओीविषयी लाचलुचपत नांदेडचे पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, लाचलुचपत विभागाने केलेल्या या कारवाईचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना ,जिल्हाभरात नागरिकांसह कर्मचारी वर्गात विविध चर्चांना मात्र उधाण आलंय.