नांदेड : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंजारा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची याचिका करणाऱ्या मोहन चव्हाण यांना औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. बंजारा समाजाचे महंत यांनी उद्धव ठाकरेंना प्रसाद आणि विभूती दिली. ठाकरे यांनी प्रसाद आणि विभूती स्वीकारल्यानंतर ती शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे दिली. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नांदेडमधील डॉ. मोहन चव्हाण कोर्टात याचिकेद्वारे केली होती. या सुनावणीवेळी औरंगाबाद खंडपीठाचे (Highcourt) न्यायमूर्ती एस.जी. मेहरे यांनी निरीक्षण नोंदवत याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली. तसेच, याप्रकरणी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन 2 लाख रुपये द्यावेत, किंवा ड्राफ्टद्वारे द्यावेत, असे आदेशही दिले होते. त्यामुळे, मोहन चव्हाण यांनी अखेर पोस्टाद्वारे डीडी पाठवला आहे.  


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्धव ठाकरे यांना 2 लाखांचा डीडी देण्यासाठी काही दिवसांपूर्वी मोहन चव्हाण मुंबईत आले होते. मात्र, त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. पोहरादेवीच्या प्रकरणात कोर्टाच्या आदेशावरून उद्धव ठाकरेंना दोन लाखांचा डीडी देण्यासाठी डॉ. मोहन चव्हाण बंजारा समाजासह मातोश्री बंगल्यासमोर हजर झाले होते. पण, चव्हाण यांच्यासह आलेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी धारावी टी-जंक्शनलाच अडवलं होतं. त्यामुळे, चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना पोस्टाद्वारे 2 लाख रुपयांचा डीडी पाठविण्याचा निर्णय घेतला. आज तो डीडी रवाना करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने मोहन चव्हाण यांच्या याचिका फेटाळत त्यांना चांगलंच सुनावलं होतं. ज्याला कायद्याची थोडीशी माहिती आहे, ती प्रत्येक व्यक्ती याला कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग म्हणेल. हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी न्यायव्यवस्थेचा केलेला वापर  आहे. माजी मुख्यमंत्र्यांवरील आरोपांना कुठलाही आधार नाही. कोर्टानं याचिकाकर्त्यांना फटकारत उद्धव ठाकरे यांना तीन आठवड्यांत डिमांड ड्राफ्टने दोन लाख रुपये द्यावेत, असे आदेश दिले होते.


मातोश्रीवर पोलिसांनी अडवले


बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशात आलेल्या कार्यकर्त्यांसह मोहन चव्हाण मातोश्रीवर आले होते. उद्धव ठाकरेंविरोधात प्रसिद्धीसाठी याचिका दाखल करणाऱ्या चव्हाणांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला होता. त्यानंतर मोहन चव्हाण त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या भेटीला आले असताना भेटीची वेळ न घेतल्याचं कारण सांगत त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी मोहन चव्हाण म्हणाले की, रितसर आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करत 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत आपली भेट घेऊन 2 लाखांचा डीडी देणार आहोत, असा अर्ज मातोश्रीवर दिला होता. त्याबाबत त्यांच्याकडून पत्र मिळाल्याची कॉपीही आम्ही घेतली होती, असं चव्हाण यांनी पोलिसांना म्हटलं होतं. 


काय आहे प्रकरण


बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या असा आरोप करत भाजपचे मोहन चव्हाण यांनी न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते मोहन चव्हाण यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. काही दिवसांपूर्वी मोहन चव्हाण हे मातोश्रीवर जाण्याच्या प्रयत्नात होते पण तसे होवू शकले नाही. त्यामुळे, न्यायालयाने एकदा पुनश्च, चव्हाण यांना ही रक्कम स्पीड पोस्टद्वारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आज मोहन चव्हाण यांनी वाजत गाजत पोस्टात जावून हा डीडी उद्धव ठाकरे यान स्पीड पोस्टाने पाठवला आहे.


हेही वाचा


जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत