नांदेड: सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे माहूर जवळच्या धानोड येथे पैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे या ठिकाणचा रस्ता बंद होऊन विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी पूर आल्यामुळे माहूर गडावरच्या रेणुका माता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


माहूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे. आज बुधवारी सकाळपर्यंत तालुक्यात 86.46 मिली मीटर एवढा पाऊस पडला आहे. माहूर तालुक्यातील वानोळा, दिगडी, रुई, हडसणी, केरोळी, शेकापूर, नेर, लिंबायत, वडसा, पडसा, टाकळी, वाईबाजार, मदनापूर, हरडफ, सायफळ, गोकुळ, सिंदखेड आदी नदीकाठच्या गावात पुराच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेत शिवाराचंही नुकसान झालं. 


पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली आहे. दरम्यान, तहसीलदार किशोर यादव, पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांनी पाहणी केली असून पूर परिस्थितीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या भागात पोलिसांची गस्त सुरू केली आहे. नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


नांदेडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी नागरिकांनी आपल्या घरी सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. माहूर गडावरील रेणुका देवी मंदिर पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यातचा निर्णय घेण्यात आला आहे.


नांदेडमध्ये अनेक गावांना पुराचा वेढा, गावांचा संपर्क तुटला


गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात संतधार पाऊस बरसत असून दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता नदी दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान जिल्ह्यात आसना नदी परिसरातील वरील भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतेय.व त्यामुळे नांदेड शहरास जोडणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड-मालेगाव राष्ट्रीय महामार्ग, नांदेड -वसमत राज्य महामार्ग, नांदेड -पूर्णा राष्ट्रीय महामार्ग, किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्ग रहदरीसाठी बंद करण्यात आले आहेत.