Nanded News: नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वडगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावकऱ्यांचा शहराशी संपर्क तुटल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान खाण्या पिण्याच्या वस्तू, अन्न-धान्य, शाळेतील विद्यार्थी व आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गाने हिमायतनगर गाठण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. परंतु याकडे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.


हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात असलेल्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना,पिछोण्डी, वडगाव, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा, वाळकी, वाळकी तांडा, या गावांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तर जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं असून, वडगाव जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन दिवसापासून वडगाव या गावाचा संपर्क तुटला आहे.


तलाव ओव्हरफलो होऊन गावच्या मार्ग बंद


गावच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची भिस्त असलेल्या वडगाव जवळील सुना तलाव तुडूंब भरला असून, ओव्हरफलो झाल्याने गावं परिसराला पुराच्या पाण्यामुळे वेढा बसला आहे. सुना प्रकल्पातील सांडवा 202 मीटर असून, त्याची उंची 1 मीटरने वाढविणे यासाठी शासनाची सीमारेषा आणखी शिल्लक आहे. तलावाला दोन कालवे असून, उजवा कालवा 12 किलो मीटरचा तर डावा कालवा 6  किलो मीटरचा आहे. तसेच तलावाची पाळू 2840 मीटर आहे. आजघडीला या तलावात झाडे झुडपे वाढली असून, गाळ साचला असल्याने आणि कालवा दुरुस्ती झाली नसल्याने व्यवस्थावपण बिघडून पाऊस जास्त झाला की, तलाव ओव्हरफलो होऊन गावाचा मार्ग बंद पडत आहे. 


पुलाची उंची वाढवण्याची मागणी 


वडगावकडे जाणाऱ्या नाल्याचा पूल लहान असल्याने मुसळधार पावसाचे पाणी नाल्यावरून वाहू लागल्याने गावाचा गेल्या दोन दिवसापासून संपर्क तुटलाय. मागील काळात या पुलाच्या पुरात वाहून दोघांचा बळी गेला होता. तर गतवर्षी आलेल्या पुरात एक ऑटो वाहून गेला होता, पण सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.