Nanded News: धर्मात राजकारण आणि राजकारणात धर्म नको यायला पाहिजे. पण राजकारणी हा धार्मिक असायला पाहिजे असे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी म्हंटलय. तर धर्माच्या माध्यमातून समाजाचे हित जोपासले जाते. धर्मात कोणतेही राजकारण नसते आणि ते नसायला देखील पाहिजे. पण याचवेळी राजकारणी मात्र धार्मिक असावा, असे झाले तर समाजाचे हित आणि विकास होईल, असेही गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणाले. नांदेड येथील कौठा मैदानावर काल बुधवारी जागतिक अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा गुरुवाणी महासत्संग सोहळा पार पडला असून, यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रश्न-उत्तरामध्ये 'धर्म में राजकारण और राजकारण मे धर्म' या विषयी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना श्री श्री रविशंकर यांनी आपली भूमिका मांडली. राजकारण आणि राजकारणात धर्म यायला नको. पण राजकारणी हा धार्मिक असायला पाहिजे, असे ते म्हणाले. बुधवारी संध्याकाळी श्री श्री रविशंकर यांच्या सत्संगाला प्रारंभ झाला होता. यावेळी मराठवाडा, विदर्भासह परराज्यातील लाखो साधक आणि अनुयायी नागरिकांनी 'जय गुरुदेव'च्या घोषात त्यांचे स्वागत केले. तर श्री श्री रविशंकर यांनी मंचावरुन हात वर करत उपस्थितांना अभिवादन करताच एकच जल्लोष करण्यात आला.
समस्या सर्वांनाच येतात
बुधवारी सायंकाळी श्री श्री रविशंकर यांच्या सत्संगाला प्रारंभ झाला. हजारो नागरिकांनी 'जय गुरुदेव' च्या घोषात त्यांचे स्वागत केले. प्रारंभीच 'कसे आहात?' असे मराठीतून विचारत त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला प्रारंभ केला. जीवन गतिशील झाले आहे. आतापर्यंत आपण काय जगलो, कसे जगलो हे देखील आठवत नाही. समस्या सर्वांनाच येतात, आतापर्यंत त्या पार केल्या ही ताकद एका अदृश्य शक्तीने मिळाली, ही शक्ती प्रत्येकामध्ये असते. ज्या ठिकाणी विश्वास आसतो तेथे समस्यांचे निवारण होते, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येकासोबत प्रेमाने वागावे
तर शारीरिक सुदृढतेबरोबरच मनाची सुदृढताही तेवढीच गरजेची आहे. त्यासाठी ध्यान, ग्यान आणि गान या त्रिसूत्रीचा स्विकार करावा. प्रत्येकासोबत प्रेमाने वागावे, कुणाचाही अनादर करु नये. भारतीय संस्कृतीही महान आहे, ती पुढे नेण्याचे काम आपण सर्वानी करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, गुरुद्वाराचे पंचप्यारे, माता साहिब गुरुद्वारा आणि नांदेड आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने श्री श्री रविशंकर यांचे स्वागत करण्यात आले. या संपूर्ण मराठवाड्यातून नागरिक हजारोंच्या संख्येन उपस्थित होते.