Single Use Plastic: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून 1 जुलै 2022 पासून 'सिंगल-युज प्लास्टिक' (Single Use Plastic) वापरावर बंदी घातलेली असताना, नादेड शहरात मात्र मुक्तपणे प्लास्टिकचा वापर होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अखेर नांदेड महानगरपालिका 'अ‍ॅक्शन मोडवर' आली असून, शहरातील दोन मोठ्या व्यवसायीकांवर छापा मारत कारवाई केली आहे. यावेळी महानगरपालिकेच्या पथकाने शासनाने प्रतिबंधक असलेल्या जवळपास एक क्विंटल प्लास्टिक येथून जप्त केले. तर दोन्ही व्यवसायीकांना प्रत्येकी 5 हजार रुपये असा एकूण 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. डिमार्ट व किसान फॅशन मॉल यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


देशात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे 1 जुलै 2022 पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे जर कोणी 'सिंगल-युज प्लास्टिक'चा वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक आणि त्यांनतर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. मात्र असे असताना शहरातील अनेक ठिकाणी 'सिंगल-युज प्लास्टिक'चा खुलेआम वापर केला जात आहे. त्यामुळे नांदेड महानगरपालिकाने या विरोधात आता थेट कारवाई करायला सुरवात केली आहे. दरम्यान डिमार्ट व किसान फॅशन मॉल या दोन मोठ्या व्यवसायीकांवर कारवाई करण्यात आली आहे.


Single Use Plastic Ban : देशभरात सिंगल-यूज प्लास्टिक बॅन; 'या' 19 वस्तूंवर बंदी


'सिंगल-युज प्लास्टिक'चा खुलेआम वापर...


नांदेड शहरातील मॉल्स, हॉटेल्स, कापड दुकान, फळ विक्रेते यांच्याकडून 'सिंगल-युज प्लास्टिक'चा सर्रास वापर सुरू आहे. शहरातील डी मार्ट या मॉल्समध्ये, कापड, खाद्य, डाळी, दही, ताक, यासह अनेक खाद्यपदार्थ व वस्तू या अद्यापही 'सिंगल-युज प्लास्टिक'मध्ये पॅक करून विकल्या जात आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर विकली जाणारे खाद्यपदार्थ, ब्रेड, पालेभाज्याही 'सिंगल-युज प्लास्टिक'मध्येच पार्सल स्वरूपात दिल्या जात असल्याचे चित्र आहे. तर नागरिकांच्याही दैनंदिन वापरात सिंगल युज प्लास्टीकचा वापर प्लास्टिक बंदी नंतरही चालूच आहे. त्यामुळे नुसती कारवाई न करता प्लास्टिक वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणेही तितकेच गरजेचे आहे.