Nanded Crime News: नांदेड येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले फौजदार शेषराव राठोड यांनी गुरुवारी (आज 5 जानेवारी) रोजी दुपारी एकच्या सुमारास गोदावरी नदीवर असलेल्या गोवर्धन घाट पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केला. सुदैवाने एका माजी सैनिकाच्या तत्परतेमुळे ते बालमबाल बचावले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने नांदेडच्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले व सध्या पोलीस मुख्यालयातील फौजदार शेषराव राठोड हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. अनेक ठिकाणी उपचार केल्यावर ते आजारातून कसेबसे सावरले. दरम्यान गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ते गोदावरी नदीच्या पात्रातील गोवर्धन घाट पुलावर पोहचले. पुलावर जाऊन त्यांनी थेट नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या एका माजी सैनिकाने तात्काळ  पाण्यात उडी मारून त्यांचा जीव वाचवला. 


50 फूट खाली पाण्यात मारली उडी...


दुपारच्या सुमारास शेषराव राठोड गोदावरी पुलावर पोहचले आणि 50 फूट उंचीवरून खाली नदीपात्रात उडी मारली. यावेळी याच परिसरात माजी सैनिक असलेल्या बावरी नावाच्या एका युवकाने तत्परता दाखवत पाण्यात उडी मारली. तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून राठोड यांचा जीव वाचवत त्यांना पाण्याचा बाहेर काढले. त्यानंतर लगेचच शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. 


पोलिसांची रुग्णालयात धाव...


दरम्यान याबाबत माहिती मिळताच वजिराबादचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह पोलीस पथकाने रुग्णालयात धाव घेली. सध्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न राठोड यांनी का केला हे त्यांना शुद्धीवर आल्यावरच स्पष्ट होणार आहे. तर याबाबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली आहे. 


घटनेची पोलीस दलात चर्चा...


जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले व सध्या पोलीस मुख्यालयातील फौजदार शेषराव राठोड खात्यात कर्मचारी पासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच परिचयाचे होते. त्यामुळे त्यांनी गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर अनेकांनी माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेतली. तर राठोड यांनी टोकाचे पाऊल उचलत थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याची चर्चा पोलीस मुख्यालयात पाहायला मिळाली.