Nanded Earthquake : नांदेड (Nanded) जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचा (Earthquake) सौम्य धक्का बसला आहे. 3 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. नांदेडमधील मुदखेड याठिकाणी रात्री 12.03 वाजता रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाल्याची माहिती आहे. दरम्यान मुदखेड तालुक्यातील नागेली, तिरकसवाडी,पाथरवाडी या तीन गावांपैकी या भूकंपाचे केंद्र आहे. भूकंप मापक वेब साईटवर भूकंप झाल्याचं दिसत आहे. मात्र विद्यापीठाच्या भूगर्भ विभागाने याविषयी अधिकृत माहिती दिली नसल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटलं आहे.


33 मिनिटात तीन राज्यांमध्ये धरणीकंप


केवळ महाराष्ट्रातील नांदेडमध्येच नाही तर हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि मणिपूरमध्येही (Manipur) भूकंपाच धक्के जाणवले. 33 मिनिटात तीन राज्यांमध्ये धरणकंप झाला. 


सर्वात आधी मणिपूरमध्ये भूकंप


सर्वात आधी काल (9 डिसेंबर) रात्री 11 वाजून 28 मिनिटांनी मणिपूरच्या चंदेलमध्ये भूकंप झाला. रिश्टर स्केलची याची तीव्रता 3.1 एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 93 किलोमीटर खोल होता. 






हिमाचलमध्ये 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप


यानंतर दोन मिनिटांनी 11.30 वाजता हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये भूकंप झाला. याची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचं केंद्र जमिनीपासून पाच किलोमीटर खोल होता.






महाराष्ट्रातील नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के


यानंतर रात्री 12 वाजून 3 मिनिटांनी महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रत 3 एवढी होती. याचं केंद्र देखील जमिनीपासून 5 किलोमीटर खोल होता. या तिन्ही राज्यांमधील भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.






म्यानमारमध्येही भूंकप


त्याआधी म्यानमारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. इतर तीन राज्यांपेक्षा या राज्यातील भूकंपाची तीव्रता जास्त होती. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.7 होती. याचा केंद्रबिंदू जमिनीपासून 95 किलोमीटर खोल होता. विशेष म्हणजे या भूकंपातही जीवितहानी झाली नाही. दोन दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये 5.8 तीव्रतेचा भूकंप आला होता.