Nanded News : मागील वर्षात समाधानकारक पाऊस (Rain) झाल्यामुळं गावरान आंब्याची (Mango) झाडे चांगलीच बहरली आहेत. सध्या परराज्यात आंब्याच्या कैरीला (Raw Mango Demand) चांगला दर मिळत असल्याने शेतकरी (Farmers) आंब्याची झाडे विकत आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.  एक झाड पाच हजार ते पंधरा हजारापर्यंत विकलं जात आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील पार्डी अर्धापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कैऱ्यांची निर्यात सुरु आहे. 


 कैरीला 50 ते 70 रुपये प्रति किलोचा दर


सध्या परराज्यात कैरीला मोठी मागणी आहे. त्यामुळं शेतकरी आंब्याची झाडं विकून चार पैसे कमवत आहेत. एक झाड साधारणत: पाच हजार ते पंधरा हजारापर्यंत विकले जात आहे. कैरी असतानाच आंबा तोडला जात असल्याने लोणचं महाग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच गावरान आंब्याचा आमरस सुद्धा महाग होऊ शकतो. सध्या बाजारपेठेत कैरीला 50 ते 70 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. अनेक शेतकरी कैरी अवस्थेत असताना आंब्याचे झाड विकत आहेत. म्हणूनच यंदा गावरान आंब्याचे लोणचं महाग होऊ शकतो.


आर्थिक फायदा मिळवण्यासाठी गावरान आंबा चांगला पर्याय


आंबा उत्पादकांना आर्थिक फायदा मिळवण्यासाठी गावरान आंबा चांगला पर्याय आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळं होणारं नुकसान शेतकऱ्यांसाठी घातक ठरु लागलं आहे. यामुळं कैरी असतानाच आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. वादळी वाऱ्यामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कैरी असतानाच आंब्याची विक्री करुन चार पैसे पदरात पाडून घेत आहेत.


मोठ्या शहरात कैरीला मागणी


अर्धापूर तालुक्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात इंदोर, अकोला, यवतमाळ, पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरांत कैरीची निर्यात करत आहे. तसेच या शहरातील बाजारपेठेत कैरीला मागणी आहे. त्यामुळं कैरीला चांगला दरही मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आतापर्यंत 200 कट्टे माल निर्यात केला आहे. आणखी दोन आठवड्यांत 500 कट्टे पाठवला जाणार असून, एका कट्ट्यात 50 किलो कैरी भरली जात असल्याची माहिती शेतकरी गोपीनाथ मोकळे यांनी दिली. सध्या कैरीला चांगला दरही मिळत आहे. याचा चांगला फायदा होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं लोणचं आणि आमरस महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Kacchi Kairi Health Benefits : आंबट कैरी आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे