Nanded News : "मी गद्दार नाही, खुद्दार आहे," असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खेड (Khed) इथल्या सभेत केले. त्यावरुन उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे. "हा गेल्या दहा वर्षातला अत्यंत सुंदर आणि दर्जेदार विनोद आहे," असं सुषमा अंधारे म्हणाल्या. नांदेडमधील (Nanded) मुखेड इथे आयोजित महाप्रबोधन यात्रेसाठी त्या आल्या होत्या. यावेळी पत्रकाराशी बोलताना सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
गर्वाचे घर खाली, मुख्यमंत्री शिंदे यांना लोकच उत्तर देतील : सुषमा अंधारे
खेड येथील ही सभा उद्धव ठाकरे यांना उत्तर देणारी असल्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा हा उन्मत्तपणा, अंहकार सर्वांना माहित आहे. गर्वाचे घर खाली असते, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यांना लोकच उत्तर देतील असे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.
देणारे मुख्यमंत्री आहात तर महिला, शेतकरी, संपकरी यांना काय दिलं सांगा? सुषमा अंधारे यांचा सवाल
मी घरी बसून आदेश देणारा मुख्य मंत्री नाही तर देणारा मुख्यमंत्री आहे असं खेडच्या सभेत एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावरुन सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. देणारे आहात तर महिलांना तिकीटात सवलत नको तर गॅसची किंमत चारशे करा, कापूस, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काय दिलं ते सांगा? संपकरी कर्मचारी, गारपीटग्रस्तांना काय दिले ते सांगा, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
वाघ पाळत नाहीत, कुत्रे मांजर पाळतात; रामदास कदम यांना सुषमा अंधारे यांचा टोला
बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता, असे वक्तव्य रामदास कदम यांनी खेड येथील सभेत केलं. त्यावरुन सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना चांगलाच टोला लगावला. वाघ पाळत नसतात तर कुत्रे-मांजर पाळतात असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. रामदास कदम यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली. त्याचा अर्थ त्यांना कळाला नाही, असं देखील अंधारे म्हणाल्या. वाघ कधी रडत नाही. इतकी संकट आली पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कधी रडले नाहीत असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.
उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय जय सिंघानियाच्या जागेत : सुषमा अंधारे
उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे याचा शोध घ्या. किरीटभाऊंनी याचा शोध घ्यावा, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले. ज्या अनिल जयसिंघानियाच्या नावाने अनेक आरोप केले जातात त्यांच्या जागेत श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कसे, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला. ती जागा कोणाची, कोणाच्या नावावर, खरेदी विक्रीची कागदपत्रे तपासावी असं सुषमा अंधारे म्हणाल्या. जय सिंघानियासोबत जवळीक कोणाची याची तपासणी करण्याची मागणीही अंधारे यांनी केली.