Amit Shah in Nanded: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेडमधील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतानाच उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. अमित शाह यांनी मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडतानाच विशेष करून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जोरदार लक्ष्य केले. शाह यांनी आपल्याला पंतप्रधान म्हणून मोदी हवेत की राहुल? अशी विचारणा जाहीर सभेत केली. अमित शाह म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्राला एक नंबरमध्ये आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठं कार्य केलं आहे.  


नांदेडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून संबोधित केले. शाह म्हणाले की, सोनियाजींच्या सरकारच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात इतिहास घडवला. या कालावधीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित ठेवण्याचा काम देखील केल. पाकिस्तानला घरामध्ये घुसून हल्ला करायचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 


उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल 


अमित शाह यांनी सांगितले की, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार असे उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले होते. त्यामुळे अस झालं का नाही? याचे उत्तर द्या  370 हटवलं हे योग्य केलं की नाही? राम मंदिर उभारणी योग्य आहे की नाही? या सगळ्यांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावी. ते पुढे म्हणाले की, मुस्लिम आरक्षण संविधानिक नाही. मुस्लिम आरक्षण पाहिजे की नाही हे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगावं. द्यायला पाहिजे की नाही हे सांगावं. जेवढे प्रश्न उभे केले आहेत या सगळ्यांचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी जनते समोर द्यावे.


समर्थन करू शकतात का?


2019 मध्ये, उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीत NDA ला सत्तेत आल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे मान्य केले होते, पण सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे गेले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजू घेतली, अशी टीका त्यांनी केली. शहा यांनी उद्धव ठाकरेंवर आणखी हल्ला चढवत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी समान नागरी संहितेबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेसच्या वीर सावरकर विरोधी भूमिकेवर कोणती भूमिका आहे, काँग्रेसची बाजू घेतल्यानंतर औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगरच्या नामांतराचे समर्थन करू शकतात का? अशी विचारणा त्यांनी केली. 


पंतप्रधान कोण हवेत? 


2014 आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदींना मोठ्या प्रमाणावर जनादेश दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. मोदींच्या नेतृत्वावरील तुमचा पाठिंबा आणि विश्वास यामुळेच भाजपला पूर्ण बहुमत मिळू शकले आणि नऊ वर्षांचे सरकार यशस्वीपणे पूर्ण करण्यात आणि देशात सुधारणा आणि विकास घडवून आणण्यात मदत झाली, असे अमित शाह म्हणाले.  रॅलीत शाह यांनी लोकांना राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी कोण पंतप्रधान म्हणून हवा आहे, असा सवाल केला.


इतर महत्वाच्या बातम्या