नांदेड: लातूर-नांदेड महामार्गालगत लांडगेवाडी जवळ असलेल्या एका शेतातील घरावर दरोडेखोरांनी दरोडा (Nanded Landgewadi Highway Robbery) टाकल्याची घटना घडली. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 


राष्ट्रीय महामार्ग 361 लगत शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहत असलेले मेहरबान परसराम चव्हाण आणि त्यांच्या पत्नी विमलबाई मेहरबान चव्हाण हे लांडगेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या  शेतात सालगडी म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत दोन मुले आणि एक सून राहते. मोठा मुलगा गणेश चव्हाण (वय 32) ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो, तर लहान मुलगा कृष्णा चव्हाण हा शिक्षण घेतो. मंगळवारी पहाटे दीडनंतर दोन चोरटे अचानक मेहरबान चव्हाण राहत असलेल्या ठिकाणी दाखल झाले. 


यावेळी त्यांनी सर्वप्रथम मोठा मुलगा आणि सून झोपलेल्या रुमचा दरवाजा बाहेरुन बंद करून बाहेर झोपलेल्या मेहरबान चव्हाण यांच्यावर हल्ला केला. लहान मुलाला तोंड दाबून ठेवले आणि घरात झोपलेल्या विमलबाई मेहरबान चव्हाण यांच्याकडे मोर्चा वळवत त्यांचे दागिने काढून घेतलं. त्यांनाही लोखंडी रॉडने आणि दगडाने मारहाण केली. संधी साधून लहान मुलगा कृष्णा धावत गावाकडे पळाला. त्याच्या आरडाओरडीमुळे लोक जमा होत असल्याचे पाहून चोरट्यांनी चांदीचे वाळे साठ तोळे, चांदीचे दंडकडे चाळीस तोळे, सोन्याचे गंठन पाच ग्रॅम, सोन्याचे मंगळसूत्र 2.5 ग्रॅम, चांदीची मूर्ती असा एकूण अंदाजे 72,000 रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. 


या हल्ल्यात विमलबाई मेहरबान चव्हाण आणि मेहरबान परसराम चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माळाकोळी पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारनंतर मुलगा गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे करत आहेत. आरोपी शोध घेण्यासाठी 5 पथके स्थापन केली आहेत. आतापर्यंत 15 संशयित लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. 


ही बातमी वाचा: