यवतमाळः आईने आपल्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीसह आत्महत्या करण्यासाठी साडीचा फास तयार केला. स्वतः चिमुकलीसह फास घेतला. सुदैवाने फास सैल पडला आणि नऊ महिन्यांच्या चिमुलगीचे प्राण वाचले. मात्र यावेळी आईचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पतीच्या मृत्यू पश्चात धक्क्यात असलेली महिला विरहात जीवन जगत होती. ही घटना मार्डी येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रोशनी आशिष झाडे ( 24) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रोशनी हिचे काही वर्षांपूर्वी हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक कन्यारत्न सुद्धा जन्माला आले. सुखाने संसार सुरु असताना दोन महिन्यापूर्वी आशिष झाडे यांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यामुळे ती मार्डी येथे माहेरी आली होती. पतीच्या निधनानंतर रोशनी ही सतत मानसिक तणावात असायची. आता आपण मुलीचा सांभाळ कसा करायचा या चिंतेत ती असायची.
वडील बाहेर गेल्यावर संपवले जीवन
मंगळवारी दिनांक 7 जून रोजी रोशनीचे वडील हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर आई घराबाहेर होती. ही संधी साधून रोशनीने सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान तिच्या 9 महिन्याच्या बाळाला घेऊन घरातील पंख्याला गळफास साडीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आली. यात रोशनीचा मृत्यू झाला होता.
अन् चिमुकली बचावली...
रोशनी ही आपल्या एका मुलीसह राहात होती. मुलीची जबाबदारी आणि पतीच्या अकाली मृत्यूमुळे रोशनी ही एकाकी झाली होती. त्यातून ती मानसिक तणावात गेली होती. त्यामुळे तिने चिमुकलीसह आत्महत्या करण्याचा निश्चय केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून चिमुकलीच्या गळ्यातील साडीचा फास सैल झाल. जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा बाळ जिवंत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळाला लगेच वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर तिथे उपचार सुरू आहे. अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत आई व वडिलांचे छत्र हरवल्याने 9 महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोशनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथे आणण्यात आला असून घटनेचा मारेगाव पोलीस तपास करीत आहे.
वाचा