नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात डिसेंबर महिन्यात होणार आहे. मात्र आता हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला कंत्राटदाराच्या बहिष्काराचे ग्रहण लागले आहे.नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीच्या कामावर बहिष्कार घालणार असल्याचे जाहीर केले आहे.


मागील तीन वर्षांपासून सुमारे 200 कंत्राटदारांचे नागपूर परिसरातील विविध कामांसाठीचे 122 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अडकल्यामुळे नागपूर कॉन्टॅक्टर असोसिएशनने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठीचे काम स्वीकारण्यास नकार दिले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातली कुठलीही कामे स्वीकारणार नाही, करणार नाही, तसेच वर्क ॲार्डर देखील घेणार नाही अशी कंत्राटदारांची भूमिका आहे.


अगोदर आमचं जुनं बिल काढा त्याचे पैसे द्या त्यानंतरच नवीन कामे स्वीकारू अशी भूमिका नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने जाहीर केली आहे. असोसिएशनने त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र देखील  पाठवले आहे.. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात लवकर तोडगा काढला नाही तर नागपूरात विधान भवन, आमदार निवास, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्र्यांचे बंगले असलेले रवी भवन परिसर, तसेच विधान भवनाच्या जवळपासच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम रखडतील आणि प्रशासनासमोर नवा पेच उभा राहिला.


कोरोनामुळे 2020 आणि 2021 मध्ये हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही. कोरोनामुळेच सर्वच अधिवेशन मुंबईला (Mumbai) झाली असली तरी त्याचाही कालावधी कमीच होता. यावर्षी कुठलीही अडचण नसल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session Nagpur) नागपुरात होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आढावा घेतला असून या अधिवेशनासाठी 95 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सोमवारपासून तयारीची कामे सुरु होणार असल्याची माहिती आहे.


बांधकाम विभागाकडून (Public Works Department) खर्चाचा आराखडा अंतिम करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. मागील अधिवेशनाच्या तुलनेत 30 कोटींचा जास्त खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नागपुरात (Nagpur) होणारे अधिवेशन सहा आठवड्यांचे घेण्याचा करार आहे. परंतु गेल्या काही दशकाचा अनुभव पाहता साधारणतः दोन किंवा तीन आठवड्यांचे होते. यंदाचे अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.