Nagpur News नागपूर: नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेला अंदाज खरा ठरवत शनिवारी अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. अवघा काही मिनिटांच्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जिल्ह्यात दाणादाण उडाली. शहरातील अनेक भागात शेकडो झाडे उमळून पडली, तर कळमना कृषि उत्पन्न धान्य बाजारात उघड्यावर ठेवलेले धान्य भिजल्याने मोठी नासधूस झालीय.
अचानक कोसळलेल्या दमदार पावसाने बाजार समितीच्या आवारात ठेवलेले धान्य, मिरची, धान, तूर, चना इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच जिल्ह्यातील काही भागांत गारपिटीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर पुढील तीन दिवस नागपूरसह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातारणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. अशातच 16 मार्च ते 19 मार्चपर्यंत नागपूरसह पूर्व आणि मध्य विदर्भात दमदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 प्रती तास वेगाचा सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेला आहे. त्यानुसार काल पूर्व विदर्भातील बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावत मोठे निकसान केले आहे. तर आजपासून पुढील तीन दिवस जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. सोबतच 17, 18 आणि 19 मार्चला नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वातावरणात होणाऱ्या संभाव्य बदलामुळे शेतकऱ्यांसह, कृषि उत्पन्न बाजार समिति, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने केली दाणादाण!
काल नागपूर शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. काल दुपारपासूनच ढगांनी एकच गर्दी केल्यानंतर दुपारी अचानक जोरदार वादळी वाऱ्यासाह पावसाच्या सरी कोसळल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेले उघड्यावरील धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर नागपूर शहराच्या परिघातील काही भागांत अवकाळी पावसासह हलक्या स्वरूपाची गारपीट झाल्याने शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साधारण अर्धा तास वादळी वारा आणि वीजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्याने शहरातील अनेक झाडे उमळून रस्त्यावर पडली. त्यामुळे अनेक वाहनांचे देखील यात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शहरातील सखोल भागातील वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच दैना झाल्याचे देखील बघायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या