नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या समोर एका ट्रक चालकाने त्याच्याच ट्रकला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरीच्या आरोपाखाली काल (14 जून) रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये त्याच ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.
अशोक जीतूलाल नागोत्रा (वय 40 वर्षे) असे त्या ट्रकचालकाचे नाव असून 9 जून रोजी अशोक नागोत्रा यांच्या ट्रकमधून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजारगाव येथील पेट्रोल पंप जवळून तेलाचे पिंप चोरीला गेले होते. घटनेच्या दिवशी अशोक नागोत्रा त्यांच्या ट्रकमध्ये तेलाचे पिंप घेऊन येत असतानाही घटना घडली होती.
ट्रान्सपोर्ट मालकाने यासंदर्भात पाच दिवसानंतर म्हणजे काल कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत अशोक नागोत्रा मिळून सापडले नाहीत. आज (15 जून) सकाळी मात्र अशोक नागोत्रा पोलीस स्टेशनसमोर पोलिसांनी आणून ठेवलेल्या त्यांच्याच ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास केला जात आहे.