नागपूर : नागपुरात गुंड किती मग्रूर झाले आहेत याचे धक्कादायक उदाहरण सक्करदरा परिसरात समोर आले. एका कार चालकाने वाहतूक हवालदाराला त्याच्या कारने उडवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत वाहतूक हवालदार अमोल चिद्गमवार यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. याच महिन्याच्या सुरुवातील पुण्यातही असाच प्रकार घडला होता. कारवाई टाळण्यासाठी चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर घेऊन जीवघेणा प्रवास केला होता.


नागपूरच्या सक्करदरा भागात काल (29 नोव्हेंबर) संध्याकाळी नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून गडद काळ्या फिल्म्स असलेल्या कारवर कारवाई केली जात होती. त्याचवेळी वाहतूक हवालदार अमोल चिद्गमवार एम एच 31 डी वी 3222 क्रमांकाची कार काचेवर गडद काळ्या फिल्म्स लावलेली दिसली. अमोल चिद्गमवार यांनी त्या कारला थांबण्याचा इशारा केला. परंतु चालक आकाश चव्हाणने कार थांबवण्याचा सोंग करत कार रस्त्याच्या कडेला वळवली. त्यामुळे ट्रॅफिक हवालदार चिद्गमवार काहीसे निर्धास्त झाले. मात्र अचानकच आकाश चव्हाणने कारची गती वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिद्गमवार यांनी समोर येत कार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाने गती आणखी वाढवत चिद्गमवार यांना थेट कारच्या बॉनेटवर घेत सक्करदरा भागातून छोटा ताजबाग परिसराकडे कार पळवली.


कारवाई टाळण्यासाठी चालकाचा वाहतूक पोलिसाला बोनेटवर घेऊन जीवघेणा प्रवास, थरार कॅमेऱ्यात कैद


अमोल चिद्गमवार बॉनेटवर असताना कार रस्त्यावरुन पळू लागली. अनेकांनी ते दृश्य पाहिले. थेट पोलिसाला उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आकाश चव्हाणने छोटा ताजबागकडे जाताना रस्त्यात अनेक दुचाकीस्वारांनाही कारने धडक दिली. त्यामध्ये अनेक दुचाकीस्वार खाली कोसळले. सुदैवाने त्यांना ही मोठी इजा झाली नाही. छोटा ताजबागजवळ पोलिसांनी त्या कारला अडवले. तेव्हा कारमध्ये आकाशसोबत एक तरुणी बसल्याचंही दिसलं.


पोलिसांनी कार चालक आकाश चव्हाणला हत्येचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा टाकण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी कार चालक आकाश चव्हाण हा नागपूरच्या कुख्यात शेखु टोळीचा सदस्य असून त्याच्यावर याआधीही मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. त्यामुळे नागपुरात रस्त्यावर फिरणारे गुंड पोलिसांना आणि कायद्यालाही जुमानत नाही तर ते सामान्य नागरिकांना किती त्रास देत असतील याची कल्पना सहज करता येते.


Nagpur News | ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत