नागपूर : सध्या राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. थंडीपासून बचावासाठी लोक जागोजागी शेकोटी करताना दिसतायेत. आजवर थंडीपासून बचावासाठी तुम्ही लोकांना लाकडाची, कपड्यांची किंवा कचऱ्याची शेकोटी पेटवताना पाहिलं असेल, मात्र नागपुरात चोरट्यांच्या एका टोळक्याने थंडीपासून बचावासाठी शेकोटी म्हणून चोरलेली दुचाकीच पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांपासून वाचवण्यासाठी एका शेतात हे चोरांचे टोळके लपले होते.  यावेळी त्यांनी हे कृत्य केले आहे.


दुचाकी चोरीसाठी कुख्यात छोटा सर्फराज आणि त्याचच्या टोळीने हे कृत्य केले आहे. सर्फराज आणि त्याच्या टोळीने गेल्या काही दिवसात नागपूरच्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दहा दुचाकी चोरल्या होत्या. त्यानंतर छोटा सर्फराज आणि त्याच्या टोळीने पोलिसांपासून लपण्यासाठी शेतात आश्रय घेतला होता. मात्र, सध्या विदर्भात कडाक्याची थंडी असल्या कारणाने शेतावर लपलेल्या सर्फराज आणि त्याच्या टोळीचे हाल होऊ लागले होते. शेकोटी पेटवण्यासाठी त्यांना कुठे लाकडं किंवा कचरा मिळाला नाही. त्यामुळे थंडीपुढे हतबल झालेल्या सर्फराजने शेकोटी म्हणून एक बाईकच पेटवली.


17 डिसेंबर रोजी यशोधरानगर पोलिसांनी पुन्हा एकदा नव्या दरोड्याचा तयारीत असलेल्या सर्फराजच्या टोळीला पकडले. त्यांच्या या तपासादरम्यान पोलिसांना छोटा सर्फराजने शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दहा दुचाकी चोरल्याची  माहिती दिली होती. जेव्हा पोलिसांनी त्या दहा दुचाकीचा थांगपत्ता विचारला, तेव्हा सर्फराज आणि त्याचे सहकारी पोलिसांना नऊ दुचाकी हस्तगत करून देऊ शकले. मात्र, दहावी दुचाकी ते पोलिसांना देऊ शकले नाहीत. पोलिसांनी कारण विचारल्यावर शेतात लपल्यानंतर थंडीपासून बचावासाठी दहावी दुचाकी शेकोटी म्हणून वापरल्याचं सर्फराजच्या टोळीने पोलिसांना सांगितले. 


हिमालयात बरेच ठिकाणी बर्फ वृष्टी होत आहे तसेच उत्तर भारताकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भाचा  पारा घसरल्याने थंडीने सर्वसामान्य नागरिकांना हुडहुडी भरली आहे. उत्तर महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान वातावरणात आणखी घट होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसात विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: