नागपूर : कार्यकर्ते किंवा स्थानिक नेत्यांनी उत्साहाच्या भरात नेत्यावर उधळलेली स्तुतिसुमनं काही वेळा चर्चेचा विषय ठरतात. नागपुरातील एका महिला पदाधिकाऱ्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी थेट पूर्वजन्मीचं नातं जोडलं आहे.


अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे नागपुरात महिलांच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. 'नितीन गडकरी यांच्यासोबत माझे रक्ताचे संबंध नाहीत. ते माझ्या जातीचेही नाहीत. तरी मला माहित नाही, असं का वाटते की त्यांच्यासोबत माझं पूर्वजन्माचं काहीतरी नातं आहे' असं कुंभारे म्हणाल्या.

सुलेखा कुंभारे एवढ्यावरच थांबल्या नाहीत. 'गडकरी हे व्यक्ती नसून एक चालतं-बोलतं विद्यापीठच आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व कार्यकर्त्यांना आकर्षित करणारं असून कार्यकर्ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर भाळतात. मी त्यांच्यावर भविष्यात पीएचडी करणार आहे' असंही त्यांनी जाहीर करुन टाकलं.

विशेष म्हणजे नागपुरात लोकसभा निवडणुकांसाठी सुलेखा कुंभारे यांनी आपल्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचाचा पाठिंबा नितीन गडकरी यांना जाहीर केला आहे.