नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष  श्याम मानव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल काही टिप्स दिल्या आहेत. नागपुरात संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ सभेत बोलताना श्याम मानव म्हणाले की लाडकी बहीण योजना हलक्याने घेण्याची गरज नाही. उलट तुम्ही लाडक्या बहिणींचं कौतुक करा, असं ते म्हणाले. मविआचं सरकार आल्यानंतर दीड हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये देऊ असं सांगावं लागेल, असा सल्ला श्याम मानव यांनी दिला.   


महिलांच्या नावावर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकार मला दीड हजार रुपये पाठवत आहे ही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. या दीड हजार रुपयांमध्ये स्त्रियांची क्रयशक्ती वाढेल. त्या कुटुंबावर पैसे खर्च करतील, त्यामुळे छोटे उद्योग व्यवसायांना चालना मिळेल. आपण या योजनेचे समर्थनच केले पाहिजे, असं श्याम मानव म्हणाले. 


महिलांना समजावून सांगितले पाहिजे की ही योजना चांगली आहे, तुम्ही ही आमच्या लाडक्या बहिणी आहात, पण पहिले तुम्ही या उद्दाम भावांना (महायुतीला) हाकला हे राज्यातील त्यांना समजावून सांगावे लागेल. तसेच पुढे महाविकास आघाडीचे सरकार आले, तर दीड हजार रुपये ऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असं महिलांना सांगावे लागेल. हे तुम्ही महिलांना बेधडक सांगावं, असा सल्ला देखील श्याम मानव यांनी दिला.


श्याम मानव पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी अनेक वेळेला बोलणे झाले आहे.  राहुल गांधींसह केंद्रातील अनेक मोठ्या काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली आहे. या सर्व नेत्यांशी बोलल्यानंतरच मी तुम्हाला सांगत आहे की महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणा. कारण,  मला खात्री आहे की महाविकास आघाडी संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे असंही श्याम मानव म्हणाले.


संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ कार्यक्रमात भाजयुमोचा गोंधळ


 नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात श्याम मानव यांची सभा सुरु झाल्यानंतर भाजयुमोच्या काही कार्यकर्त्यांनी देशाचे संविधान 2014 नंतरच कसे धोक्यात आले असा प्रश्न विचारात सभेत घोषणाबाजी केली होती. प्रतिउत्तरात श्याम मानव यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली. त्यामुळे सभेत काही वेळ व्यत्यय येऊन गोंधळ निर्माण झाला होता. त्याच मुद्द्यावर बोलताना श्याम मानव म्हणाले की कार्यक्रमात जे काही झाले, याच्यातून हे सिद्ध झालंय की आम्ही संविधान आणि लोकशाही धोक्यात आल्याबाद्दल जे आरोप करत आहोत, त्यात तथ्य आहे आणि तेच आज सिद्ध झाल्याचे श्याम मानव म्हणाले. 


निवडणूक जाहीर झालेली असताना आचारसंहिता लागलेली असताना भाजयुमोचे कार्यकर्ते उघडरित्या विचार मांडण्यावर , अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन आणत आहेत.  त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार आले तर आपल्या अनेक प्रकारच्या स्वातंत्र्यांवर गदा येईल, असा इशारा ही श्याम मानव यांनी दिला.


श्याम मानव यांचं भाषण :



इतर बातम्या : 


BJP List : भाजपच्या 30 टक्के आमदारांचा पत्ता कट, 110 नावांवर शिक्कामोर्तब; शुक्रवारी पहिली यादी जाहीर होणार 


New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान