नागपूर : जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) आरमार स्थापन करायचे होते, तेव्हा सिंधूबंदी म्हणजेच समुद्र ओलांडल्याने पाप लागते या भावनेतून हिंदू सैनिक समुद्रात जायला तयार झाले नाही. अशा वेळेस मुस्लीम सैनिकांनी साथ दिली आणि मुस्लीम मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकावला, असे वक्तव्य दंगल मुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली (Shaikh Subhan Ali) यांनी केले आहे. तर सुभान अली यांच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.   


नागपुरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार मोतीराम मोहाडीकर यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शेख सुभान अली बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 31 सुरक्षारक्षक होते. त्यापैकी 20 सुरक्षारक्षक मुस्लीम होते. म्हणजेच शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी मुस्लीम मावळ्यांना दिली होती, शेख सुभान आली यांनी म्हटले आहे.


स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश मुस्लीम


छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सव्वा लाख सैन्य होते. त्याचा कमांडर नुर खान बेग हा मुस्लीम होता. शिवाजी महाराजांचा गनिमीकावा ज्या घोडदलावर अवलंबित होता, त्या घोडदलाचा कमांडर सिद्धी हिलाल हा देखील मुस्लीम होता आणि त्या घोडदलात 58 हजार घोडसवार देखील मुस्लीम होते. महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुस्लीम इब्राहिम खान होता. तर छत्रपतींचा कायदेशीर सल्लागार व खाजगी सचिव मौलाना काझी हैदर हा ही मुसलमान होता. त्याच काझी हैदरला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश बनवले होते, असे सुभान अली म्हणाले. 


शिवाजी महाराज मुस्लीमांचे शत्रू होते, असे का बिंबविले गेले?


तुकाराम महाराज आणि जिजाऊ यांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतर ही काही गुरु होते. रत्नागिरी येथील संत याकुत बाबा या मुस्लिम संतांना शिवाजी महाराज यांनी त्यांचे गुरु मानले होते. नंतरच्या काळात तिथे मशिदसाठी महाराजांनी याकुत बाबांना 653 एकर जागा ही दिली होती. एवढे सर्व असताना शिवाजी महाराज मुस्लीमांचे शत्रू होते, असे का बिंबविले गेले? असा सवालही सुभान अली यांनी उपस्थित केला आहे. 



स्वराज्याचा कार्याचे इस्लामीकरण करण्याचा घाट : प्रकाश महाजन


दरम्यान, सुभान अली यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया येत आहेत. सुभान अली यांच्या वक्तव्याचा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हटलंय की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य कार्याचा इस्लामीकरण करण्याचा घाट सध्या सुरू आहे. त्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ आहे. पहिली गोष्ट म्हणजे हिंदू धर्मात समुद्र ओलांडू नये असे कुठेही म्हटलेले नाही. प्रभू श्रीराम हे समुद्र ओलांडूनच रावणावर स्वारी करून गेले होते. बाली, इंडोनेशिया आदी देशांमध्ये हिंदू संस्कृती ही समुद्र ओलांडून गेलेली आहे. त्यामुळे सुभान अली यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. परत शहाजी राजे व सरफोजी राजे हे नावे मुस्लीम संत यांच्या नावावरून नाही तर पूर्वीपासूनच अशी नावे ठेवलेली आहे, असे विविध पुस्तकांचे दाखले देत तोही मुद्दा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खोडून काढला आहे. 


ती स्वराज्याची लढाई होती : संजय गायकवाड 


तर आमदार संजय गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात अनेक मुस्लीम होते. पण शिवाजी महाराजांनी कधीही त्यांना मुस्लीम धर्मीय म्हणून ठेवलं नाही ती स्वराज्याची लढाई होती. हे खरं आहे की, त्याकाळी मनुवादी प्रवृत्तीला विचारल्याशिवाय समुद्रात प्रवेश करता येत नव्हता. मात्र शिवाजी महाराजांनी सगळे निर्बंध धुडकावून समुद्रात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही प्रमाणात मुस्लीम मावळे देखील होते. पण 100 टक्के मुस्लीम होते, असं नाही. याकुत बाबांना छत्रपती शिवाजी महाराज मानायचे. त्यामुळेच त्यांना त्याकाळी शिवाजी महाराजांनी मोठी जमीन देखील दिली हे खरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


नागपूरमध्ये हिट अँड रन; भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जागीच ठार, पोलिस घटनास्थळी