नागपूर : महायुतीतील पक्ष श्रेयवादावरून सतत एकमेकांवर नाराज असतात आणि संधी मिळताच एकमेकांना चिमटेही काढतात. त्याचाच प्रत्यय शनिवारी नागपुरात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आला. आपल्यानंतर दुसरं काही निर्माण होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का? असा जाहीर टोला शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. त्याचसोबत आपल्या विभागाने निधी दिलेल्या कामाचे श्रेय मात्र बावनकुळे आणि विदर्भातील नेत्यांना मिळत आहे. त्यामुळे श्रेयवाद कसा करायचा हे आपण शिकलो असाही टोला शिरसाट यांनी लगावला. 

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विधी महाविद्यालयात संविधान उद्देशिका पार्कचे उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच विधी महाविद्यालयात शिकले आहेत. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी सर्व नेते आणि मान्यवर विधी महाविद्यालयातील एका रूममध्ये बसले होते. तिथे घडलेल्या एका किस्स्याचा संदर्भ यावेळी शिरसाट यांनी त्यांच्या भाषणात दिला.

Sanjay Shirsat On Devendra Fadnavis : संजय शिरसाटांचा टोला

संजय शिरसाट म्हणाले की, तिथे मुख्यमंत्री फडणवीस पोहचले आणि गप्पा मारताना 'आपण बसलेली ही रूम पाडणार' असल्याचं त्यांनी सांगितलं. जणू आपल्यानंतर इथे दुसरे काही निर्माण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे का? असा टोला शिरसाट यांनी त्यांच्या भाषणात लगावला.

Devendra Fadnavis Nagpur Speech : आकसाने बोललो नाही, फडणवीसांचे स्पष्टीकरण

काही वेळानंतर भाषणासाठी उठलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात संजय शिरसाट यांनी याबाबत अर्धसत्य सांगितल्याचं दावा केला. ती रूम पाडली जाणार, मात्र हे आपण आकसाने नव्हे तर विधी महाविद्यालयात नवी इमारत तयार करायची आहे त्या भावनेतून बोलल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

श्रेयवाद कसा घ्यायचा हे शिकलो, शिरसाटांचा टोला

दोघांमधील कलगीतुरा एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हता. तर शिरसाट यांनी त्यांच्या भाषणात श्रेयवाद कसा घ्यायचा हे आपण आजच्या कार्यक्रमात शिकल्याचा टोला लगावला. इथल्या कामासाठी माझ्या विभागाने ही निधी दिला, मात्र सर्वजण बावनकुळेंचे कौतुक करत आहे. इथे सर्व विदर्भातील नेते असून ते एकोप्याने वागले. त्यामुळे श्रेयवाद कसा घ्यायचा आपण इथे शिकलो अशी भावना संजय शिरसाटांनी व्यक्त केली. 

शिससाटांनी केलेल्या वक्तव्यावर नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिलं. नागपुरातील संविधान उद्देशिका पार्कच्या कामासाठी सर्वच विभागांचा निधी वापरल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं.