Nagpur Winter Session 2023 : नागपूरमध्ये (Nagpur) सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पार्श्वभूमीवर संगणक परिचालकांकडून (Computer Operator) आंदोलन केले जात आहे. तर, 13 डिसेंबर पासून वेतन वाढीच्या मागणीसाठी नागपुरातील टेकडी रोडवर बसलेल्या संगणक परिचालकांच्या आंदोलनाकडे शासन-प्रशासन लक्ष देत नाही असा आरोप करत आज संगणक परिचालकांनी अर्धनग्न आंदोलन केले. गेल्या सहा दिवसात दोन वेळ पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावले, एकदा लाठीचार्ज केले, तर एकदा 65 पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यातही घेतले असल्याचा आरोप संगणक परिचालकांनी केला आहे. तर, प्रशासन आमचे म्हणणे ऐकून घेऊन वेतन वाढ देत नाही, तोवर आम्ही परत जाणार नाही असा निर्धारही या संगणक परिचालकांनी व्यक्त केला. आज सकाळपासून हे संगणक परिचालक प्रशासन आणि शासनाचा लक्ष वेधण्यासाठी टेकडी रोडवर अर्ध नग्न आंदोलनही करत आहेत.
काय आहे मागणी...
राज्यभरातील 27 हजार ग्रामपंचायती पैकी सुमारे 19 हजार ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक कार्यरत असून, पीएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, शेतकरी कर्जमाफी योजना अशा अनेक योजनांसाठी गाव स्तरावरील आकडे गोळा करण्याचा काम याच संगणक परिचालकांच्या माध्यमातून होतो. मात्र खाजगी कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या या संगणक परिचालकांना अत्यंत तुटपुंजा म्हणजेच 6 हजार 930 रुपये एवढा वेतन मिळतो. मात्र, सरकार एका संगणक परिचालकामागे खाजगी कंपनीला साडेबारा हजार रुपये देते. खाजगी कंपनीच्या माध्यमातून आमचं शोषण सुरू असून, शासनही आमच्या रास्त मागण्यांकडे लक्ष घालत नाही असा आरोप या संगणक परिचालकांनी केला आहे. गेले सहा दिवसांपासून संगणक परिचालकांचा मोर्चा नागपुरातील टेकडी रोड या ठिकाणी बसून आहे. मात्र प्रशासन किंवा शासनाकडून कोणीही भेट घ्यायला आलेला नाही असा आरोप ही संगणक परिचालकांनी केला आहे.
आता मागे हटणार नाही...
मागील अनेक वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संगणक परिचालक सतत आंदोलन करत आहेत. प्रत्येक अधिवेशनात मोर्चा आणि आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेतात. मात्र, नेहमी त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता यंदाच्या हिवाळी अधिवेशनात देखील संगणक परिचालकांनी पुन्हा एकदा आंदोलन केले आहे. मात्र, मागील सहा दिवसांपासून नागपुरात ठाण मांडून बसलेल्या संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप संगणक परिचालकांनी केला आहे. त्यामुळे आज सकाळपासून संगणक परिचालक प्रशासन आणि शासनाचा लक्ष वेधण्यासाठी टेकडी रोडवर अर्ध नग्न आंदोलन करत आहे. तसेच, आता मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका संगणक परिचालकांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
शेती प्रश्नावरुन रविकांत तुपकर आक्रमक, विधानभवनाकडे जाणारा शेतकऱ्यांचा ताफा पोलिसांनी अडवला