Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi : एकीकडे राज्यात शिवसेनेतून फूट पडल्यामुळे समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दोन गटांमध्ये निवडणूक आयोगासमोर लढा सुरू आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी साथ मिळण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी ठाकरे गटाची युती होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांनीही बोलणी सुरू असून काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress - NCP) सोबत आल्यास हरकत नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.


वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती होणार असून याची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे अशा बातम्या सुरू आहे. यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, 'अधिकृत घोषणा एकतर माझ्याकडून झाली पाहीजे किंवा त्यांच्याकडून, उद्धव ठाकरे यांनी मागे सांगितले होते, की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेतलं पाहीजे. जर आले तर आम्ही काँग्रेसच ही स्वागत करू आणि राष्ट्रवादीच ही स्वागत करू, माझं दोघांनाही विरोध नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.


'आम्हाला त्यांनी नाकारलं कारण त्यांचं म्हणणं आहे की, आम्ही फक्त दलित पुरतच मर्यादित राहावं, ओबीसी आणि मराठावर बोलू नये अशी अट आहे, ती आम्हाला मान्य नाही.' असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. आज अमरावती दौऱ्यावर ते आले तेव्हा आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे जर शिवशक्ती आणि भीमशक्ती युती झाली आणि त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आले तर तेव्हा वंचितची ओबीसी आणि मराठा बद्दलची भूमिका ही काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य होईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


खरंच ठरलंय की फक्त चर्चाच...


ठाकरे गटासोबतच्या युतीसंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. 'सध्या रेखाताई ठाकूर रायगडमध्ये आहेत आणि मी विदर्भात आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा एकतर माझ्याकडून व्हायला हवी किंवा त्यांच्याकडून व्हायला हवी. घोषणा कधी होईल? तर बोलणी करण्यासाठी दोन्ही बाजूंचे गट बसलेले आहेत. त्यांचं अंतिम झालं की त्यानुसार घोषणा होईल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.


काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल...


दरम्यान, 2019च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबतची बोलणी फिसकटली होती. तेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरही त्यांनी भूमिका मांडली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


हारिस रंगूनवालाविरोधात अपहरण, खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल