नागपूर : सर्वात मोठे कलावंत राजकीय नेतेच असतात. ते खोटे रडतात, ते खोटेच हसतात. खोटे अश्रूही ढाळतात. ज्याच्यावर प्रेम नाही त्याला ही प्रेम दाखवतात, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांची ही आगळी वेगळी व्याख्या केली आहे. ते नागपुरात 'कलावंतांच्या नजरेतून' नितीन गडकरी या कार्यक्रमात ते बोलत होते.

अभिनेते तर अनेकवेळेला राजकीय नेते होतात, मात्र नेते ही अभिनेते असतात का? या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, नेत्यांमध्ये अभिनय क्षमता असतेच. अनेक नेते खोटे रडणे आणि हसणे दाखवतात. मात्र, मी त्यातला नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

मी कधीच खोटे बोलत नाही. लोकांचे कामं होण्यासारखे नसेल तर मी त्यांना स्पष्ट सांगतो. माणसाने चतुर असावे मात्र चालाख असू नये, असे सूचक वक्तव्यही गडकरी यांनी केले. तुम्ही एखाद्याला एक वेळा किंवा दोन वेळा मूर्ख बनवू शकतात, मात्र कोणालाही नेहमीच मूर्ख बनवू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

मी खूप हुशार नाही. अभ्यासात नेहमीच सेकंड क्लास मध्ये पास झालो. मात्र, जर माझे बौद्धिक कौशल्य योग्य दिशेने वापरले असते तर मी महिन्याला 200 कोटी रुपये कमावणारा माणूस असतो. मात्र, दुर्दैवाने मी अनुत्पादक ठिकाणी माझे बौद्धिक कौशल्य वापरल्याचे खंत त्यांनी बोलून दाखविली.

अभ्यासात खूप हुशार असणे आणि जीवनातील यशाचे सरळ संबंध नसतो. जे मेरिट किंवा फर्स्ट क्लासमध्ये पास होतात ते सरकारी अधिकारी बनतात. मात्र थर्ड क्लासमध्ये पास होणारी लोकं मंत्री बनतात, याची अनेक उदाहरणे ही गडकरी यांनी दिली.

राजकारणात येण्यासाठी काही विशेष क्वालिटी लागत नाही, जो देशासाठी समाजासाठी काम करू शकतो.  जो इमानदारी ने काम करू शकतो तो राजकारणात येऊ शकतो. मात्र, कार्यकर्त्यांनी राजकारणात येताना आपापल्या कुटुंबाला व्यवस्थित सांभाळायला पाहिजे नंतर राजकारण करायला हवे, असा सल्ला ही गडकरी यांनी राजकारण्यांना दिला.