नागपूर : बाजारात नामांकित कंपनी चितळे फूड्सचे नकली गुलाबजाम मिक्स विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी चितळेच्या गुलाबजाम मिक्ससारखी हुबेहूब पॅकिंग असलेले नकली गुलाबजाम मिक्सची पॅकेट्स जप्त केली आहेत. ज्याठिकाणी याची निर्मिती केली जात होती तो नागपुरातील कारखानाही पोलिसांनी सील केला.
नागपूरच्या कळमना परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेले काही दिवस विदर्भातील बाजारात चितळे फूड्सच्या नावाने काहीसा स्वस्त गुलाबजाम मिक्स सर्रास विकला जात होता. चितळे फूड्सच्या व्यवस्थापनाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे त्याची तक्रार दिली.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी चौकशी करत कळमना परिसरातील विजयनगरमधील नकली गुलाबजाम मिक्स बनवणारा कारखाना शोधून काढला. या कारखान्यात अत्यंत घाणीत हे गुलाबजाम मिक्स तयार केले जात होते. डालडा, पामोलिन तेल, दुय्यम दर्जाचा मैदा ही सामग्री वापरून मोठ्या आकाराच्या कुलरच्या टाकीमध्ये हे पदार्थ मिसळले जाते होते. त्यानंतर मशिन्सच्या मदतीने हुबेहूब चितळे फूड्सच्या इंस्टंट गुलाबजाम मिक्ससारखी पॅकिंग करुन ते बाजारात विक्रीला पाठवले जायचे.
नागपूर पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी दीपक तलरेजा यांच्यासह विक्रीत मदत करणारा जयेश लखनानी या दोघांना अटक केलं आहे. विशेष म्हणजे अनेक वर्ष याची विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही नकली गुलाबजाम मिक्सची पाकीटं ओळखणे शक्य होत नव्हतं. त्यामुळे दोन महिन्याच्या कालावधीत हे नकली गुलाबजाम मिक्स विदर्भातील आणि महाराष्ट्रातील बाजारात पसरले गेले होते.
बनावट गुलाबजाम मिक्स पॅकेट कसे ओळखाल?
- असली पॅकेटवरील गुलाबजामचं चित्र फिक्कट रंगाचं आहे.
- नकली पॅकेटवरील गुलाबजामचं चित्र गडद रंगाचं आहे.
- असली पॅकेटच्या पाठीमागे सोनेरी पट्टीवर कंपनीची माहिती आणि बॅच नंबर लिहिलेले आहे.
- तर नकली पॅकेटच्या पाठीमागे सोनेरी पट्टीवर काहीच लिहिलेले नाही.
- असली पॅकेटवर इंग्रजीच्या स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका नाहीत.
- नकली पॅकेटवर मात्र इंग्रजी आणि व्याकरणाच्या चुका आहे.