नागपूर : विरोधकांकडून देशात दंगली घडवण्याचा डाव असल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपुरात आज भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी बोलताना गडकरी यांनी काँग्रेसवर चांगलंच तोंडसुख घेतलं. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी गरीबी हटावचा नारा देत आहेत. मात्र, गरीबी हटवण्याचं काम मोदीच करतील असा दावाही त्यांनी केला. यावेळी  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

गरिबी हटाओच्या नावाखाली कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वत:चीच गरिबी हटविली. मात्र निवडणूक आली की त्यांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांची बरोबर आठवण येते. विरोधकांचे राजकारण भयाभोवतीच फिरते आहे. खोट्या गोष्टी समोर करुन अपप्रचार करण्यात येत आहे. दलित, मुस्लिम, वंचितांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप गडकरी यांनी केला.

काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती : मुख्यमंत्री फडणवीस
भाजपने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले आहे. काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केला आहे. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. भाजपा सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत असून 2020 ला हे स्मारक पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  भाजपाचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाला जागा तर मिळालीच शिवाय मोठ्या प्रमाणात निधीही मिळाला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही. काँग्रेसने अनूसूचित जातीचा फक्त वापरच केला, असा आरोप त्यांनी केला.

मोदींमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. इंदू मिल प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी तीन दिवसांत जागा देण्याचे आदेश दिले. मोठ्या प्रमाणात निधीही दिला. 2020 पर्यंत इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहील.  ज्यावेळी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करण्यात आली. त्यावेळी केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार होते. पण त्यांनी हा प्रश्न मार्गी लावलाच नाही. त्यांची या जागेवर नजर होती. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:च्या आई-बापांची स्मारके उभा केली. त्यांना अनुसूचित जातीचा फक्त मतांसाठीच वापर केला, असेही ते म्हणाले.