Nagpur News : कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत असल्याने ग्राहकामंध्ये खरेदीचा चांगला उत्साह बघण्यास मिळत आहे. यासाठी शहरातील बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. दिवाळीच्या (Diwali 2022) सणात लायटिंगसाठी अनेक नागरिक रंगबिरंगी विद्युत माळा आणि लाईटचे इतर उपकरणांचा वापर करतात, पण आजही मातीच्या दिव्याचे महत्त्व कमी नाही झाले. बदलत्या फॅशनच्या जमान्यात कुंभारांनीही आपली कला बदलून मातीच्या दिव्यांना फॅन्सी लूक दिला आहे. यासह आर्टिफिशियल फुलांचे तोरणांनाही ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.
टेराकोटा रंगाने बनलेल्या दिव्यांना रंगबिरंगी रंगासोबत विविध प्रकारच्या आकर्षक खड्यांनी सजविले आहे. दिव्यांच्या डिझाईनमध्ये आता बराच बदल झाला आहे. यासोबतच यंदा बाजारात मातीच्या घंट्यांच्या झुमरलाही ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. यावेळी बहुतांश लोकांना दिव्यांमध्ये कमळ, हात, सूप, झोपडीसारखे, कंदील, चौकोनी, पान, हार्ट, स्वस्तिक, शंख, गणेश आणि फुले यांसारख्या कोरलेल्या सोनेरी रंगाच्या दिव्यांकडे आकर्षित करत आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या किमती 25 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत आहे. तर साधे आणि हलके डिझाइन असलेले दिवे 30 ते 50 रुपये डझनने विकले जात आहेत. आर्टिफिशियल फुलांच्या तोरणांच्या कच्च्या मालाच्या दरातही वाढ झाली असल्याने यंदा तोरणांचे दरही 20 टक्क्यांनी वाढले असल्याचे आझम खान यांनी सांगितले. सध्या आर्टिफिशियल फुलांचे तोरण 350 पासून 3000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
पूजेसाठी मातीची थाळी
हनुमाननगर परिसरातील व्यापारी नंदू जैस्वाल यांनी यावेळी सांगितले की, दिवाळीच्या मुहूर्तावर एकीकडे मातीपासून बनवलेल्या दिव्याला लोक पसंती देत आहेत, तर दुसरीकडे मातीपासून बनवलेल्या पूजेच्या थाळीलाही लोकांची पसंती आहे. गणेशाच्या आकाराची थाळीही लोकांना खूप आवडते. या दिवाळीला लोक लक्ष्मी-गणेशाची पूजा मातीच्या दिव्यांसोबत मातीच्या ताटात करतील. यासोबतच घराची सजावट करण्यासाठी 9 मुखी आणि 21 मुखी दिव्यांना घरी सजविण्यासाठी खरेदी करत आहेत. त्यांची किंमत 200 ते 500 रुपयांपर्यंत आहे. लोकांच्या आवडीनुसार हे दिवे बनवले जातात. लोकांच्या मागणीनुसार 9 मुखी आणि 21 मुखी दिव्यांना लक्ष्मी आणि गणेशाची मूर्तीही बनवण्यात आली आहे.
माती, मेणबत्तीचे दिवे
यावेळी मातीच्या डिझाईनचे दिव्यांमध्ये रंगबिरंगी मेणबत्ती भरलेली आहे, जी खरेदी करणाऱ्यांना भूरळ पाडत आहे. लोकं या दिव्यांची देखील मागणी करत आहे. यांची किंमत 30 ते 60 रूपया पर्यंत आहे. ते खुल्यासोबत डझन आणि अर्धा डझनच्या पॅकिंगमध्येही येत आहे. घराच्या सजावटीत भर घालत असलेल्या नव-नव्या डिझाईनमुळे या मेणाच्या दिव्यांची क्रेझ नागपूरकरांमध्ये वाढली आहे.
वेगवेगळ्या प्रकारे दिव्यांच दर
- कलर केलेले दिवे 20 रुपये नग
- कलर स्टोनचे दिवे 25 रुपये नग
- गणेशमूर्तीचे दिवे 50-70 रुपये
- स्टॅण्ड दिवे 35-40 रुपये
- 9 मुखी दिवे 200 रुपये
- 21 मुखी दिवे 350 रुपये
मातीच्या घंट्यांचे आकर्षक झुमर
मातीच्या झुमरचे दर त्यामध्ये वापरलेल्या घंट्यांमधून लावण्यात येतात. यामध्ये साधारणतः 5 घंट्यांपासून तर 21 घंट्यांपर्यंतचे आकर्षक झुमर सध्या बाजारात चलनात आहेत. यामध्ये 15, 18 आणि 21 घंट्यांच्या झुमरची चांगली मागणी आहे. 15 घंट्यांचा झूमर 300 ते 380 दरम्यान उपलब्ध आहे. तर 18 घंट्यांचा 450 आणि 21 घंट्यांचा झुमर 550 रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे अशोक चौक परिसरातील विक्रेता सोनू सय्यद अली यांनी सांगितले.
मूर्तींचाही बाजार हॉट
मातीचे दिवे, झूमर, ताट यासह विविध आकर्षक 'शो पिस' म्हणून मातीच्या मूर्तींचीही मागणी चांगलीच वाढली आहे. यात हत्ती, महिलेची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती, फ्लॉवर पॉट आदी उपलब्ध आहेत. आकारानुसार याचे दर असून 180 रुपयांपासून तर तब्बल 2400 रुपयांपर्यंत या मातीच्या मूर्ती उपलब्ध आहेत.
इतर महत्त्वाची बातमी