Nagpur News : भारतीय जनता पक्षाच्या (BJP)अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी (Jamal Siddiqui) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "सर तन से जुदा" अशा आशयाची ही धमकी असून जमाल सिद्दीकी यांच्या नागपूरमधील (Nagpur) कार्यालयात टाकलेल्या एका पत्राच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. जमाल सिद्दीकी यांचे स्वीय सहाय्यक काल (20 ऑक्टोबर) काही कामानिमित्ताने नवीन सुभेदार लेआऊट परिसरातील कार्यालयात गेले होते, तेव्हा त्यांना कार्यालयाच्या दाराजवळ धमकीचे हे पत्र आढळून आले. 


आरएसएसच्या गुरुपूजन कार्यक्रमात सहभागी झाल्याने धमकी
जमाल सिद्दीकी हे जुलै महिन्यात नागपुरात चक्रपाणी नगर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुपूजन कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावरुन त्यांना हे धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. धमकी देणाऱ्याने जमाल सिद्दीकी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुपूजनाच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत असे फोटोही धमकीच्या पत्रासह कार्यालयात टाकले आहेत. 


पत्रात काय लिहिलंय?
सक्करदरा परिसरात जमाल सिद्दीकी यांचं कार्यालय आहे, जे काही दिवसांपासून बंद होतं. सिद्दीकी यांचे स्वीय सहाय्यक काल या कार्यालयात गेले होते. तेव्हा त्यांना तिथे धमकीचं हे पत्र सापडलं. 'रसूल-ए-पाक की गुस्ताखी में सर तन से जुदा किया जाएगा,' असं पत्रात लिहिलं होतं. शिवाय या पत्रासोबत जमाल सिद्दीकी आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यातील दोन फोटो देखील जोडले होते.


सिद्दीकी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
या प्रकरणी जमाल सिद्दीकी यांनी सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तसंच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही याबाबत ते भेट घेणार आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


VIDEO : Nagpur BJP अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष jamal siddiqui यांना धमकी, सर तन से जुदा अशा आशयाची धमकी