Nitin Gadkari :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बेळगावच्या तुरुंगातून गँगस्टर जयेश कांथा उर्फ शाकीर याने दिलेल्या धमकीच्या प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री झाली आहे. एनआयए चे एक विशेष पथक आज सकाळी नागपुरात दाखल झाले.  एन आय ए चे डीआयजी विक्रम खलाते आणि एसपी प्रवीण इंगवले या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे पथक सकाळपासून नागपूरच्या पोलीस जिमखाना मध्ये नागपूर पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेत आहेत. त्यासाठी झोन टू चे उपायुक्त राहुल मदने यांच्यासह धंतोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सकाळपासूनच पोलीस जिमखाना मध्ये उपस्थित आहेत.


जयेश कांथा उर्फ शाकिर याने 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन करून पहिल्यांदा शंभर कोटी आणि दुसऱ्यांदा दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.  ती न दिल्यास गडकरी यांना जीवे मारण्याची ही धमकी जयेशने दिली होती. नागपूर पोलिसांच्या तपासात धमकीचे हे कॉल कर्नाटक मधील बेळगाव तुरुंगातून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. धमकीच्या दोन्ही प्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते नंतर दोन्ही गुन्ह्यांमध्ये युएपीए ही लावण्यात आलेला होता.


एनआयएचे पथक नागपुरात दाखल


नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश उर्फ शाकीरचे संबंध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यासह इतर दहशतवादी संघटनांसोबत असल्याचे समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांकडून त्याची सूचना महाराष्ट्र तसेच केंद्रीय गृह विभागाला देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह विभागाने या प्रकरणात दहशतवादी संघटनांची भूमिका लक्षात घेऊन एनआयएला देखील समान अंतर तपास करण्याची सूचना केली होती आणि त्याच मालिकेत आज एनआयएचे पथक नागपुरात दाखल झाले आहे.


देश विघातक कामांमध्ये सक्रिय


बेळगावच्या तुरुंगात कैदेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोन वेळेला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध एक नव्हे तर अनेक प्रतिबंधित संघटनांशी होते. तो देश विघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांशी संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी त्याचे हे संपर्क बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. एबीपी माझाने एनआयएच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कुठलीही  प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.


हे ही वाचा :


नितीन गडकरींसह कर्नाटकातले मोठे नेते होते रडारवर, जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर