नागपूर : ज्वालामुखीतून लाव्हा रस कसा बाहेर पडतो. तर तो खद खद खद बाहेर पडतो, अशा खास वऱ्हाडी शैलीत MPSC च्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या आणि त्यामुळेच विदर्भ व महाराष्ट्रात तरुणाईमध्ये "खद खद सर" म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून आज अपक्ष उमेदवार म्हणून नितेश कराळे यांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने त्यांचे विद्यार्थी आणि त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणारे तरुण उपस्थित होते.
कोरोना आला आणि वर्गात बसवून पारंपरिक पद्धतीने शिकवल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीला ब्रेक लागला. तेव्हा पर्याय म्हणून सुरु झालेल्या ऑनलाईन शिक्षणात अनेक शिक्षकांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून रंजक बनविले. त्यापैकीच एक वर्ध्यातले नितेश कराळे. ज्वालामुखीतून लाव्हा रस कसा बाहेर पडतो. इथपासून तर मराठीतल्या स्वर आणि व्यंजनांचा अचूक उच्चर करताना जिव्हा कशी वळवावी लागते हे सर्व खास वऱ्हाडी-गावरान शैलीत विद्यार्थ्यांना शिकवणारे कराळे गुरुजी त्यांच्या खास शैलीतील शिकवणुकीमुळे युट्युब आणि इतर समाज माध्यमात खद खद सर म्हणून प्रसिद्ध झाले. आज तेच कराळे सर महाराष्ट्रातील तरुणाईच्या मनातील खद खद दूर करण्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरले आहे.
पुण्यात एमपीएससीचा अभ्यास केलेले आणि त्यानंतरही अनेक परीक्षा देऊन बेरोजगार राहिलेल्या नितेश कराळे यांनी वर्ध्यात स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करणारे क्लास सुरु केले होते. सुरुवातीला पुणेरी पॅटर्न असे नाव ठेवले. मात्र, कराळे सर आणि त्यांची खास वऱ्हाडी गावरान भाषेचा पुणेरी पॅटर्न या भारदस्त नावासोबत जुळला नाही. मग काय कराळे गुरुजींनी आपल्या भाषेतील खास गावरान शैलीलाच जमेची बाजू बनवून रंजक पद्धतीने शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला वर्गापुरतं मर्यादित राहिलेली त्यांची शिकवणुकीची शैली कोरोनामुळे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचली. त्यांचे व्हिडीओ वायरल होऊ लागले आणि त्याना लाखोंनी व्युव्ज येऊ लागले. आपल्या त्याच प्रसिद्धीला आता निवडणुकीच्या मैदानात आजमावण्याचा आणि विदर्भातील तरुणाईच्या मनातील खद खद खऱ्या अर्थाने सरकार दरबारी पोहोचवण्याचे कराळे गुरुजी यांनी ठरविले आहे, त्यासाठीच निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विधान परिषदेचे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया अशा सहा जिल्ह्यात विस्तारलेले आहे. तिथल्या पदवीधर तरुणांमध्ये कराळे सर आधीच हिट आहेत. त्यामुळे त्यांची आगळी वेगळी शैली भाजप, काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षांना डोकेदुखी ठरू शकते.